मुंबई : चेहर्यावरील निस्तेजपणा, अॅक्ने, पिंपल्सचा त्रास कमी करण्यासाठी अनेक प्रगत आणि महागड्या ब्युटी ट्रिट्मेंट्स बाजारात उपलब्ध आहेत. मात्र त्याचा वापर करण्याआधी स्वयंपाकघरात दडलेली काही आजीबाईच्या बटव्यातील औषधं नक्की आजमावून पहा. त्यापैकी एक म्हणजे जायफळ.
निद्रानाश कमी करण्यासाठी, डिसेंट्रीसारख्या आजारांवर जायफळ जितके फायदेशीर ठरते. तितक्याच परिणामकारकपणे जायफळ चेहर्याचे सौंदर्य खुलवण्यास मदत होते. जायफळामुळे ब्लॅकहेड्सचा त्रास कमी होतो.
दोन टेबलस्पून जायफळाच्या पावडरमध्ये दोन टेबलस्पून दूध मिसळा. त्याचे एकत्र मिश्रण बनवून पेस्ट तयार करा.
चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून त्यावर तयार पेस्ट लावून हळूवार वर्तुळाकार दिशेने मसाज करा.
त्वचेच्या ज्या भागावर ब्लॅकहेड्स अधिक आढळतात अशा भागावर अधिक लक्ष द्या. तेथील भागावर मसाज करताना जायफळाचे कण मळ बाहेर काढण्यास मदत करतात.
2-3 मिनिटे मसाज केल्यानंतर चेहरा थंड पाण्याने सवच्छ करा आणि सुती कापडाने हलकाच पुसून घ्या.
तुमची त्वचा शुष्क असल्यास मलईचा अधिक वापर करा तसेच तेलकट त्वचेच्या लोकांनी दूधाऐवजी जायफळाची पावडर मधामध्ये मिसळावी.
जायफळ त्वचेवर एक्सफोलिएंट म्हणून काम करते. त्यामधील अॅन्टीबॅक्टेरियल घटक त्वचेवरील मळ दूर करण्यास मदत करतात.परिणामी त्वचेवर होणारा अॅक्ने, ब्लॅकहेड्सचा त्रास कमी होण्यास मदत होते. मात्र बाजारातून विकतची जायफळ पूड विकत आणून वापरण्याऐवजी घरीच जायफळाची पावडर बनवा. अनेकदा बाजारात मिळणार्या पावडरमध्ये भेसळ झालेली असते.