ग्रीन टीचे फायदे तर आहेत; पण सेवनावर नियंत्रण ठेवा अन्यथा...

ग्रीन टीचं अतिसेवन किंवा चुकीच्या वेळी सेवन करणं नुकसानकारक ठरु शकतं.  

Updated: Nov 26, 2019, 12:16 PM IST
ग्रीन टीचे फायदे तर आहेत; पण सेवनावर नियंत्रण ठेवा अन्यथा... title=
संग्रहित फोटो

मुंबई : ग्रीन टीचे अनेक फायदे असल्याचं ऐकलं आहे. ग्रीन टी लठ्ठपणा कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे. पण अनेकांना ग्रीन टीच्या अधिक सेवनामुळे होणाऱ्या नुकसानाबाबत कदाचित माहिती नसेल. फिटनेसकडे अतिशय काटेकोरपणे पाहणाऱ्या लोकांचा ग्रीन टी महत्त्वपूर्ण भाग आहे. अनेकांना ग्रीन टी कधी आणि किती प्रमाणात घ्यावी याबाबत माहिती नसते. ग्रीन टीचं अतिसेवन किंवा चुकीच्या वेळी सेवन करणं नुकसानकारक ठरु शकतं.  

- ग्रीन टी कधीही रिकाम्या पोटी घेऊ नये. यामुळे अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. यात २४ ते २५ एमजी कॅफिन असतं. दिवसांतून ४-५ वेळा ग्रीन टी पिण्याने शरीरात कॅफिनचं प्रमाण वाढतं. त्यामुळे कमी झोप, चक्कर येणं, घाबरल्यासारखं होणं अशा समस्या होऊ शकतात.

- काही लोक ग्रीन टी नॉर्मल चहाप्रमाणे जेवणासोबतही घेतात. असं करणं चुकीचं आहे. जेवणासोबत ग्रीन टी पिण्याने शरीरात आर्यनची कमतरता होऊ शकते. 

- ग्रीन टी कधीही औषधांसोबत घेऊ नये. काही औषधं नर्वस सिस्टमसाठी असतात. त्यामुळे औषधं ग्रीन टीसोबत घेतल्यास नुकसान होण्याची शक्यता असते. यामुळे ब्लड प्रेशरची समस्याही होऊ शकते. 

  

- गरोदर महिला आणि बाळाला स्तनपान करणाऱ्या महिलांनी ग्रीन टीचं सेवन करु नये. हे बाळासाठी नुकसानकारक ठरु शकतं.

- याशिवाय ग्रीन टीच्या अतिसेवनाने हाडं कमकुवत होण्याचा धोकाही असतो. त्यामुळे शरीरात कॅल्शियम काम करत नाही आणि ते बाहेर टाकलं जातं.