मुंबई : बिहारच्या सामान्य कुटुंबात जन्मलेले प्रभावशाली गणितज्ञ 'आनंद कुमार' यांच्यावर चित्रपट येत असून त्याचे शूटिंग डिसेंबरपासून सुरु होईल. चित्रपटाचे नाव 'सुपर-30' असे असून हा चित्रपट पुढच्या वर्षी २३ नोव्हेंबरला प्रदर्शित होईल.
रिलायंस एंटरटेनमेंट आणि फॅटम फिल्म्स एकत्रितपणे या चित्रपटाची निर्मिती करत असून हृतिक रोशन यात मुख्य भूमिकेत असणार आहे. रिलायंस एंटरटेनमेंटचे चीफ ऑपरेशन ऑफिसर शिबासिश सरकारने सांगितले की, " 'सुपर-30' ही संघर्ष दाखवणारी आणि प्रेरणा देणारी एक सुंदर मानवीय कथा आहे. जी आम्ही चित्रपट रूपात घेऊन येत आहोत. चित्रपटाचे शूटिंग डिसेंबरमध्ये सुरु होणार असून हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, याची खात्री आहे,"
'आनंद कुमार' ज्यांच्यावर हा चित्रपट बनत आहे ते 'सुपर-30' कार्यक्रमासाठी ओळखले जात होते. त्या कार्यक्रमांतर्गत आयआयटी प्रवेश परीक्षा पास करू इच्छिणाऱ्या गरीब मुलांना मदत केली जात होती.
२००२ मध्ये 'सुपर 30' या कार्यक्रमाअंतर्गत समाज्यातील वंचित मुलांना आयआयटीची परीक्षा देण्यासाठी तयार करण्यास मदत केली जात होती. आनंद कुमार प्रत्येक वर्षी ३० विद्यार्थ्यांना निवडून त्यांना वर्षभर आयआयटी प्रवेश परीक्षा देण्यासाठी मोफत प्रशिक्षण देत असतं.