मुंबई : बॉलिवूडमधील महिला सुपरस्टार अशी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरलेल्या श्रीदेवी यांच्या मानधनाचा आकडाही मोठा असे. ९०चे दशक हे त्यांच्या अभिनय कारकीर्दीचे सूवर्ण दशक होते. त्या काळात अभिनयासाठी मानधन म्हणून १ कोटी रूपये शुल्क आकारणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री होत्या.
अभिनयाच्या जोरावर श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. लहानपनापासूनच अभिनयाची आवड असल्यामुळे श्रीदेवी यांच्या अभिनय कारकीर्दीला सुरूवातही लहानपणापासूनच झाली. १९६३मध्ये जन्मलेल्या श्रीदेवी यांनी १९६७मध्ये बाल कलाकाराच्या रुपात अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. 1978 साली सोलवाँ सावन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम केले आहे.
बॉलिवूडमधील सदमा, नागिन, निगाहें, मिस्टर इंडिया, चालबाज, लम्हे, खुदा गावाह, जुदाई अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. याचबरोबर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांना 2013 साली भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होतं. याशीवाय त्यांना आतापर्यंत पाच फिल्मफेयर पुरस्कारही मिळालेत.