अभिनेता सैफचा हल्लेखोर गेला कुठं?, जंगजंग पछाडूनही आरोपी सापडेना!

Saif Ali Khan Attacked: अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करुन पसार झालेला आरोपी 24 तास उलटल्यानंतरही पोलिसांना सापडलेला नाही.

Pravin Dabholkar | Updated: Jan 17, 2025, 08:37 PM IST
अभिनेता सैफचा हल्लेखोर गेला कुठं?, जंगजंग पछाडूनही आरोपी सापडेना! title=
सैफ अली खान

Saif Ali Khan Attacked: हल्ल्याच्या 24 तासानंतरही बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानच्या हल्लेखोराला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये. दरम्यान सुतारकाम करणाऱ्या संशयिताला चौकशीनंतर पोलिसांनी सोडून दिलंय...आरोपीचं छायाचित्र मिळूनही आरोपीला पकडण्यात पोलीस य़शस्वी झालेले नाहीत. मुंबई पोलिसांची तब्बल 20 पथकं आरोपीच्या मागावर असल्याची माहिती आहे.

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करुन पसार झालेला आरोपी 24 तास उलटल्यानंतरही पोलिसांना सापडलेला नाही. आरोपीनं मध्यरात्री एक वाजता सैफ अली खानच्या सतगुरु इमारतीत प्रवेश केला. फायर एक्झिटच्या पायऱ्या चढून तो जाताना दिसला. सैफवर चाकू हल्ल्यानंतर पहाटे अडीचच्या सुमारास तो त्याच पायऱ्यांवरून खाली उतरताना दिसला.

हा आरोपी वांद्रे स्टेशनकडं गेल्याचं काही सीसीटीव्हीत दिसल्याचं सांगण्यात येतंय. वाटेत त्यानं कपडेही बदलल्याचं तपासात समोर आलंय. पहाटेची पहिली लोकल पकडून तो वसई-विरारकडं गेल्याची माहिती पोलिसांना मिळालीये. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी तब्बल 20 पोलीस पथकं तयार केलीयेत. पण पोलिसांच्या हाती काहीच लागलेलं नाही. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं होतं. सैफच्या घरात फ्लोअर पॉलिश करणा-यांपैकी तो एकजण असल्याचं सांगण्यात येतंय. पण त्याच्याकडून कोणतीच माहिती पोलिसांना मिळाली नाही. किंवा हल्ल्यात त्याचा कोणताही समावेश नसल्याचं स्पष्ट झालंय. उलट ज्या संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्याच्या आईनं पोलिसांचे वाभाडे काढले.

हल्लेखोरानं सैफकडं एक कोटी रुपयांची खंडणी मागितली असा जबाब त्यांच्या घरातील केअरटेकरनं दिलाय. हा जबाब पोलीस पूर्णतः खरा मानून तपास करताना दिसतायेत. सैफवर झालेल्या हल्ल्याचा तपास पोलीस फक्त चोरीच्या दृष्टीकोनातूनच तपास करत असल्याचं सरकारनं सांगितलंय.

एक हल्लेखोर येतो सैफच्या घरात विनाअडथळा घुसतो. सुरक्षित असलेल्या घरात त्याला कोणीही अडवत नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातंय. हल्लेखोराला इमारतीत प्रवेश करु देण्यात काही लोकांनी मदत केली असण्याची शक्यता आहे. पोलीस त्या दृष्टीनं तपास करत नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. पोलिसांनी सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबाला वाढीव पोलीस संरक्षण देण्याची तयारीही दाखवलीये.

सैफ अली खानचा हल्लेखोर मुंबईत मोकाट फिरतोय. पण स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी तुलना होणाऱ्या मुंबई पोलिसांना तो अजूनही सापडलेला नाही. ओळख पटलेला आरोपी 24 तासांपेक्षा जास्त वेळ पोलिसांना सापडत नसल्यानं पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्हं निर्माण झालंय.