Walmik Karad : बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत आहे. दोन कोटींच्या खंडणीसाठी मे 2024 मध्ये अवादा कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरचं अपहरण झालं होतं, अशी माहिती समोर आलीय. याप्रकरणी गुन्हाही दाखल आहे. कदाचित त्याच वेळी पोलिसांनी कठोर कारवाई केली असती तर संतोष देशमुख प्रकरण घडले नसते अशी चर्चा आता सुरुय.
बीडमध्ये वाल्मिकचा खंडणीखोरीचा धंदा?
रमेश घुलेनंही आवादाच्या मॅनेजरचं केलं होतं अपहरण
खंडणीसाठी वाल्मिकच्या किती टोळ्या?
बीड जिल्ह्यात वाल्मिकची दहशतीची फॅक्ट्री असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. वाल्मिक कराडनं खंडणी गोळा करण्यासाठी अनेक टोळ्या कामाला लावल्याचं सांगण्यात येतंय. पोलिस रेकॉर्डची तपासणी केली असता एक धक्कादायक माहिती समोर आलीय. आवादा पवनचक्की घोटाळा प्रकरण हे पहिल्यांदा घडलं नाही... मे 2024मध्येही रमेश घुले नावाच्या गुंडाच्या टोळीनं आवादा कंपनीचं काम बंद पाडलं होतं. एवढंच नव्हे तर खंडणी दिली नाही म्हणून प्रोजेक्ट मॅनेजर सुनील शिंदेंचं अपहरण करुन दोन कोटींची खंडणी मागितली होती.
28 मे 2024ला 2 कोटींच्या खंडणीसाठी रमेश घुले आणि त्याच्या साथीदारांनी सुनील शिंदेंचं अपहरण केलं होतं
- - सुनील शिंदे त्यांच्या साथीदारांसह केज गेस्ट हाऊसमध्ये जेवायला जात होते.
-- यावेळी एका गाडीने त्यांच्या गाडीला थांबवलं
-- त्यातून काही लोक खाली उतरले आणि गावठी कट्टा दाखवत त्यांचं अपहरण केलं.
- - सुनील शिंदेंना आरोपींनी त्यांच्या गाडीत बसवलं आणि एका हॉटेलमध्ये नेलं
- - पवनचक्कीच्या रस्त्यांची आणि इतर कामं दिली नाहीत तर महागात पडेल, अशी धमकी त्याठिकाणी दिली.
- - जमीन अधिग्रहण करायची असेल तर त्यासाठी 2 कोटींची खंडणी द्यावी लागेल, असं सुनील शिंदेंना धमकावलं
- - त्यानंतर रमेश घुलेने जमीन अधिग्रहण करणा-या कंपनीच्या अधिका-याला भगवानगड इथे बोलावलं
- - रमेश घुले हा सुनील शिंदेंसह तिकडं भेटायला गेला. त्याने सुनील शिंदेंना रस्त्यात थांबवलं
- - यावेळी पोलीस आल्याने आरोपी रमेश घुले आणि त्यांच्या साथीदारांनी पळ काढला
- - या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यावेळी पोलिसांनी जुजबी कारवाई केली. त्यावेळीच जरब बसेल अशी कारवाई केली असती तर संतोष देशमुखांची हत्याच झाली नसती असं देशमुख कुटुंबाला वाटतं.
रमेश घुलेला आवादा कंपनीकडून खंडणी वसूल करता आली नाही त्यामुळं वाल्मिक कराडं आवादा कंपनीकडून खंडणी गोळा करण्याची जबाबदारी सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेवर टाकल्याचं सांगण्यात येतंय. रमेश घुलेनंतर सुदर्शन घुलेनं खंडणीवसुलीचं काम हातात घेतल्याचं सांगण्यात येतंय.
रमेश घुले या आरोपीला त्या वेळी अटक झाली आणि त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली आणि खंडणी प्रकरण पून्हा सुरू झाले मात्र यानंतर रमेश घुले हा मागे हटला आणि सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे ने प्रकरण हातात घेतले.
रमेश घुले आणि वाल्मिक कराडचा संबंध काय असा प्रश्न विचारला जाऊ शकतो...याबाबतही एक मोठी माहिती समोर आलीय. वाल्मिक कराडला जेव्हा खंडणी प्रकरणात केज कोर्टात आणलं तेव्हा त्या परिसरात रमेश घुलेचा वावर होता असं सांगण्यात येतंय. यावरुन रमेश घुले आणि सुदर्शन घुले याच्या गुंड टोळ्या वाल्मिकसोबत काम करत असल्याचं अधोरेखित झालंय. पोलिसांना बीड मनापासून गुन्हेगारीमुक्त करायचंच असेल तर वाल्मिकसोबतच्या छोट्या मोठ्या टोळ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतेय.