PM Narendra Modi letter Rakul Preet Singh Jacky Bhagnani : बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि अभिनेता जॅकी भगनानी यांचा शाही विवाहसोहळा नुकताच पार पडला. या दोघांनी गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्नगाठ बांधली. या सोहळ्याला त्यांचे कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि बॉलिवूडमधील कलाकारही उपस्थित होते. रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्या विवाहसोहळ्यानंतर अनेक कलाकार त्यांना शुभेच्छा देत आहेत. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी या नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी या दोघांनी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक पत्र शेअर केले आहे. यात नरेंद्र मोदी यांनी जॅकी आणि रकुल यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहे. त्याबरोबर लग्नाचे आमंत्रण पाठवल्याबद्दल आभारही व्यक्त केले आहेत.
नरेंद्र मोदी यांनी या पत्राच्या सुरुवातीला जॅकी भगनानीचे वडील वाशू भगनानी आणि त्याची आई पूजा भगनानी यांचा उल्लेख केला आहे. "जॅकी आणि रकुल यांनी त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे. या शुभ प्रसंगी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. या जोडप्यासाठी येणारे प्रत्येक वर्ष आनंदाचे जावो. मला लग्न सोहळ्यासाठी आमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद. त्यासोबत नवविवाहित जोडप्याला मी पुन्हा माझ्या शुभेच्छा देतो", असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या पत्रावर रकुल प्रीत सिंगनेही प्रतिक्रिया दिली आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तुमचे खूप खूप आभार, तुमचे आशीर्वाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, असे रकुलने म्हटले आहे. तर जॅकी भगनानीने पंतप्रधानांचे खूप खूप आभार. आमच्या या नवीन प्रवासासाठी तुमचे आशीर्वाद खूप महत्त्वाचे आहेत, असे म्हटले आहे.
दरम्यान रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी लग्नासाठी बाहेरगावी डेस्टिनेशन वेडिंग करण्याची योजना आखली होती. परंतु भारतात पर्यटनाला चालना दिली पाहिजे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितल्यानंतर रकुल आणि जॅकीने गोव्याची निवड केली. या लग्नसोहळ्याला अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, वरुण धवन, नताशा दलाल, भूमी पेडणेकर, शाहिद कपूर, मीरा राजपूत आदी कलाकारांनी हजेरी लावली होती.