Panchak Marathi Movie Trailer Out: '15 ऑगस्ट' या यशस्वी मराठी चित्रपटानंतर लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला 'पंचक' हा आगळावेगळा मराठी चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. नुकताच या चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
कुटुंबाची गोष्ट आपल्याला रूपेरी पडद्यावर पाहायला आवडते. अगदी आपल्याच घरातील ही सगळी मंडळी आहेत असं वाटावं इतकी त्यांची गोष्ट ही आपल्या मनात घर करून जाते. 'पंचक' हा चित्रपटही अशाच एका गोड कुटुंबाची गोष्ट सांगतो जी थोडी अतरंगी आहे परंतु तेवढीच रोमांचक आहे. कोकणातील या कुटुंबाची ही कहाणी काहीशी विनोदी पद्धतीनं आपल्या समोर येते.
हा चित्रपट जयंत कठार व राहुल आवटे यांनी दिग्दर्शित केला आहे. मराठी चित्रपटांमध्येही सध्या मल्टिस्टारर चित्रपट पाहायला मिळत आहेत. 'पंचक' या चित्रपटातूनही ज्येष्ठ तसेच लोकप्रिय कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळते आहे. या चित्रपटातून आदिनाथ कोठारे, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर, ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी सतीश आळेकर, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर अशी तगडी स्टारकास्ट आहे. त्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरात उत्सुकता आहे. काल या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी अभिनेत्री माधुरी दीक्षित, पती डॉ. श्रीराम नेने आणि या चित्रपटाची संपुर्ण स्टारकास्ट उपस्थित होती.
हेही वाचा : ''2nd Inning च्या टप्प्यावर!'', 'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्रीच्या आईनं दुसऱ्यांना बांधली लग्नगाठ
कोकणातील एका गोड कुटुंबाची ही कहाणी आहे. कुटुंबात भीतीचे वातावरण आहे. घरात पंचक लागल्यानं आता कोणाचा नंबर लागणार? अशी भीती घरातील प्रत्येक व्यक्तीला वाटू लागली आहे. या चित्रपटाचा टीझर जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा 'आता कोणाचो नंबर?' या वाक्यानं आपल्या सगळ्यांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली होती. या सगळ्या गडबड गोंधळात कुटुंबात वेगळी तारांबळ उडाली आहे. मध्येच आपल्याला ऑपेराही ऐकायला येतो. तेव्हा आता खोतांच्या घराला लागलेलं हे पंचक नक्की कधी आणि कसे सुटणार यासाठी या कुटुंबातील प्रत्येक जण प्रयत्नशील आहे. त्यामुळे एकंदरीतच या भीतीमुळे उडालेली तारांबळ विनोदी पद्धतीनं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
यावेळी ट्रेलर लॉन्च दरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल आवटे म्हणाले, ''श्रद्धा आणि अंधश्रद्धा याविषयावर या चित्रपटाद्वारे ज्ञान देण्याचा आमचा हेतू अजिबात नाही. चित्रपटातून मनोरंजन करणारी कथाच समोर येते. एका घरात एखादी घटना घडते आणि त्यातून निर्माण झालेल्या भीतीमुळे आपोआपच होणारे विनोद घडतात. अशी ही 'पंचक'ची संकल्पना आहे. चार्ली चॅप्लिनच्या महणण्यानुसार, 'लाईफ इज अ ट्रॅजेडी इन क्लोज अप बट अ कॉमेडी इन लॉंग शॉट'.हा चित्रपटही तसाच आहे. जेव्हा आम्ही तो लिहिला तेव्हा त्या पात्रांसाठी ती भीती होती परंतु प्रेक्षकांसाठी ही धमाल आहे.''
आपल्या या आगामी चित्रपटाबद्दल माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने म्हणतात, ''यापुर्वीही आम्ही एका चित्रपटाची निर्मिती केली होती. तो सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. 'पंचक' हा आमचा पहिला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार सिनेमा आहे. 'पंचक' खरंतर सर्वार्थानेच खास आहे. या चित्रपटात तगडी स्टारकास्ट आहे. कथा उत्तम आहे. 'पंचक' हा त्यापैंकीच आहे. या चित्रपटातून एक विचित्र स्थिती प्रेक्षकांसमोर येणार आहे परंतु अतिशय हलक्याफुकल्या पद्धतीनं ती प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली आहे. हा एक कौटुंबिक आणि विनोदी चित्रपट आहे, जो प्रत्येकानं एकत्र पाहावा.''