मुंबई : 22 फेब्रुवारी 2024 बॉलीवूड चित्रपटांमध्ये स्त्रीप्रधान कथांवर आधारित चित्रपटांचा ट्रेंड वाढला आहे. लेखक आफताब हसनैन द्वारा लिखित "यहाँ अमिना बिकती है" या प्रसिद्ध नाटकावर आधारित "अमीना" हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात चित्रपटाचे म्युझिक लॉन्च करण्यात आले. यावेळी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक कुमार राज, सहनिर्माते धरम, ललित्य मुन्शॉ, कार्यकारी निर्माते विनोद यादव, चित्रपटाचे लेखक डॉ. किशन पवार, संगीतकार सुशील शर्मा, प्रवीण कोळी, योगिता कोळी, ध्रुवन मूर्ती, रणजित जैस्वाल, उमेश चोरगे, अमित, मीनू सिंग, गासिल नौबर्ट, आरती वझिरानी, सोनम राणे, लता हया, शैलेंद्र, गौरव सिंग आदी उपस्थित होते.
'अमीना' या चित्रपटात अभिनेत्री रेखा राणा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच अनंत महादेवन आणि उत्कर्ष कोहली सारखे प्रतिभावंत कलाकार देखील आहेत . संगीतकार इस्माईल दरबार यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. दिग्दर्शक कुमार राज द्वारे या चित्रपटातून महिलांच्या काही गहन समस्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
दिग्दर्शक कुमार राज यांचा मागील चित्रपट, 'तारा, द जर्नी ऑफ लव्ह अँड पॅशन' 750 हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित झाला आहे, त्याला 487 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत आणि त्याचा सात वर्ल्ड बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये समावेश आहे. आता त्यांना 'अमीना' या चित्रपटाकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत.
"अमीना" ही एका तरुण मुलीची भावनिक कथा आहे जिला तिच्या पालकांनी लग्नासाठी विकले होते, ही कथा स्त्री धैर्य, निडरता, जिद्द आणि स्वस्वातंत्र्य याच्या कल्पना सादर करत आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर हा थेट संवाद आहे.
चित्रपटाच्या म्युझिक लाँच प्रसंगी दिग्दर्शक कुमार राज म्हणाले, "अमीना हा चित्रपट केवळ एक चित्रपट नाही, तर हे समाजातील एका मोठ्या घटकाचे वास्तव आहे. आपल्या समाजातील अनेक महिलांनी अशाच प्रतिकूल परिस्थितीचा सामना केला आहे. या चित्रपटाद्वारे लोकसंख्येच्या मोठ्या वर्गावर होत असलेल्या अन्याय आणि अत्याचारावर अर्थपूर्ण चर्चा सुरू आहे.
चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद यांनी व्हॉइस ओव्हर केला आहे.चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. ज्यामध्ये कव्वाली, आयटम साँग, एक सुफी गाणे रेह-में-खुदा आणि एक रोमँटिक गाणे देखील आहे. 'तेरे तेरे' हे गाणे आफ्रिकेच्या 'तूफान' टीमने गायले आहे. जे एक रॅप सॉंग आहे. 'यहाँ अमिना बिकती है' हे शीर्षकगीत गायक जावेद अली यांनी गायले असून सुजित कुमार शर्मा यांनी संगीत दिले आहे. ओ रे प्रिया, हे रोमँटिक गाणे शुभांगी केदार आणि ध्रुवन मूर्ती यांनी गायले आहे आणि प्रवीण कोळी यांनी संगीतबद्ध केले आहे.
रेह-में-खुदा हे गाणे अभिनेत्री रेखा राणा हिने स्वतः फरहाद भिवंडी वाला सोबत गायले आहे, ज्याला संगीत परेश शाह यांनी दिले आहे. चित्रपटाचे आयटम साँग "मेरी बोली लगी है" हे लत्तु एक्का यांनी गायले आहे आणि हितेश पटेल यांनी संगीत दिले आहे.रिबन म्युजिक कंपनी द्वारा चित्रपटाचे संगीत रिलीज करण्यात आले. रिलायन्स डिस्ट्रिब्युशन द्वारे 12 एप्रिल रोजी चित्रपटगृहात अमिना हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.