'खुलता कळी खुलेना' आणि 'तुला पाहते रे' या मालिकांमधून झळकलेली अभिनेत्री म्हणून अभिज्ञा भावेला ओळखले जाते. ती कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. अभिज्ञाने मराठीसह हिंदी कलाविश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिज्ञाने 6 जानेवारी 2021 रोजी मैहुल पैसोबत लग्नगाठ बांधली. आता अभिज्ञाने तिच्या लग्नातील कपड्यांचा किस्सा सांगितला आहे.
अभिज्ञा भावे आणि मेहुल पै या दोघांनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने त्यांचं लग्न किती साध्या पद्धतीने झालं होतं? लग्नाचे कपडे कोणी ठरवले होते? खर्च कसा केला होता? याबद्दल भाष्य केले. यावेळी अभिज्ञाने त्यांच्या साखरपुड्याचा किस्साही सांगितला. "आम्ही दोघेही साखरपुड्याच्या वेळी कुटुंबासोबत लंचसाठी भेटलो होतो. त्यानंतर ही तुझी अंगठी घे आणि माझी अंगठी दे अशा पद्धतीने आमचा साखरपुडा झाला. त्यानंतर आम्ही जेवलो. आम्ही काही फॅन्सी केलं नाही", असे अभिज्ञा भावे म्हणाली.
"आम्ही लग्नही साध्या पद्धतीने केले. आम्ही एक बँकवेट बुक केला. मी लग्नासाठी खूप उत्साही होते. मी ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत एन्जॉय केले. त्या ठिकाणी एकही मीडिया नव्हता. आम्ही 2021 ला लग्न केलं, तेव्हा कोव्हिडचे काही निर्बंधही होते. आम्ही 100 लोकांमध्ये लग्न केलं. आम्हाला एका बजेटमध्ये लग्न करायचं होतं. खरतंर मेहुल रजिस्टर लग्न करुया, असे म्हणत होता. पण मला विधीनुसार करायचे होते आणि माझ्या हट्टापायी ते विधीपूर्वक लग्न झाले. आम्ही महाराष्ट्रीयन पद्धतीने अर्धा तुमचा खर्च अर्धा आमचा खर्च असंच लग्न केलं", असेही अभिज्ञा भावेने म्हटले.
अभिज्ञाने लग्नाच्यावेळी जांभळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. याबद्दल तिला प्रश्न विचारण्यात आला होता. आता यावरही तिने उत्तर दिले आहे. "मी त्यावेळी जांभळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती. मेहुलनेही त्याच रंगाचे कपडे परिधान केले होते. मी जांभळा रंग निवडण्यामागचे एक विशिष्ट कारणही होते. आमच्या लग्नातील सर्व कपडे अभिज्ञानेच ठरवले होते. माझ्या लग्नाचे कपडे या पद्धतीने निवडण्यामागचा एवढाच विचार होता की, माझ्या लग्नाचे फोटो किंवा त्यातील कपडे हे जेव्हा मी माझ्या मुलांना दाखवेन. तेव्हा त्यांनी हे म्हटलं पाहिजे की माझी आई ट्रेंडसेटर होती किंवा तिने फारच वेगळं लग्न केलं. हे माझ्या डोक्यात पक्कं होतं", असे ती म्हणाली
जेव्हा अभिज्ञाने हा रंग निवडला असं मला सांगितलं होतं. तेव्हा मी तिच्यावर हसलो होतो. त्यावेळी मला प्रश्न पडला होता की आता लग्नातही आपल्यावर लोकं हसणार आहे, असे मला वाटत होतं. पण तो छान दिसत होता. जेव्हा मी ते कपडे ट्राय केले होते, तेव्हा मलाही याबद्दल खात्री नव्हती. आमच्या कपड्याचा रंग जांभळा असल्याने आम्ही बॅकड्रॉपचा रंगही तोच ठेवला, जेणेकरुन तो छान दिसेल, असे मेहुलने यावेळी सांगितले.