मुंबई : ‘फितूर’ या सिनेमानंतर बॉलिवूड अभिनेत्री तब्बू रूपेरी पडद्यावरून गायबच झाली आहे. तब्बू आता रोहित शेट्टी याच्या ‘गोमलाम अगेन’ मध्ये काम करत आहे. नुकतीच अशी बातमी समोर आली की, तब्बूला एका सिनेमासाठी देशाच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भूमिका ऑफर झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच भारतीय मुलगी उजमा अहमदला भारतीय परराष्ट्र मंत्रीलयाच्या प्रयत्नांमुळे पाकिस्तानातून सुखरूप परत आणण्यात आलं. उजमासोबत एका पाकिस्तानी व्यक्तीने बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने लग्न केले होते. उजमाला पाकिस्तानातून सुखरूप देशात परत आणण्यात स्वत: सुषमा स्वराज यांनी प्रयत्न केले. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रयत्नांमुळे उजमा २५ मे ला भारतात आली. उजमाच्या या बायोपिकचं दिग्दर्शन धीरज कुमार करणार आहेत.
असे सांगितले जात आहे की, धीरजने या सिनेमातील सुषमा स्वराज यांच्या भूमिकेसाठी तब्बूला विचारले आहे. मात्र, एका दुस-या रिपोर्टमध्ये तब्बूने या बातमीला खोटे सांगितले आहे. धीरज कुमारने अशा कोणत्याही रोलसाठी मला विचारले नसल्याचे तिने म्हटले आहे.
धीरज कुमारने नंतर सांगितले की, ‘या सिनेमाच्या कास्टवर सध्याच काही बोलणे योग्य ठरणार नाही. मात्र, उजमाच्या रोलसाठी आम्ही परिणीती चोप्रा आणि तापसी पन्नूच्या नावांचा विचार सुरू आहे’.