सुपरहिट चित्रपटातून डेब्यू, 27 व्या वर्षी अचानक सोडलं बॉलिवूड; लपून केलं लग्न अन् आता 4700 कोटींच्या कंपनीचा मालक

या अभिनेत्याने वयाच्या 24 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर चर्चेचा विषय ठरला होता. पण वयाच्या 27 व्या वर्षी त्याने कॉर्पोरेट जगतात जाण्यासाठी बॉलिवूडला रामराम ठोकला.   

शिवराज यादव | Updated: Jun 13, 2024, 06:31 PM IST
सुपरहिट चित्रपटातून डेब्यू, 27 व्या वर्षी अचानक सोडलं बॉलिवूड; लपून केलं लग्न अन् आता 4700 कोटींच्या कंपनीचा मालक title=

स्वप्नांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत हजारो तरुण तरुणी बॉलिवूडमध्ये आपल्याला एक संधी मिळावी यासाठी प्रोडक्शन हाऊसचे उंबरठे झिजवत असतात. यामधील काहींना संधी मिळते, तर काहीजण मात्र अपेक्षांचा बोजवारा गुंडाळत माघारी परतात. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर पहिल्याच चित्रपटाने आपल्याला स्टार करावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. ह्रतिक रोशन, ऋषी कपूर, आमीर खान अशा काही मोजक्या अभिनेत्यांच्या नशिबी हे भाग्य आलं आहे. या सर्वांमध्ये एक बाब सारखी आहे ती म्हणजे ते करिअरमध्येही पहिल्या यशस्वी झाले. पण अनेक असे अभिनेते आहेत जे पहिल्या चित्रपटानंतर बॉलिवूडमधून गायबच झाले. असाच एक अभिनेता आहे, ज्याने कॉर्पोरेट जगतात प्रवेश करण्यासाठी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. 

वयाच्या 27 व्या वर्षीच सोडली चित्रपटसृष्टी

गिरीश कुमार याने 2013 मध्ये 'रमय्या वस्तावय्या' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. प्रभूदेवाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. हा चित्रपट तामिळ चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटात श्रुती हसन आणि सोनू सूदही मुख्य भूमिकेत होते. चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्यातील गाणी सुपरहिट झाली होती. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार कमाई केली नव्हती. कमी बजेटमध्ये तयार झाल्याने चित्रपटाने 40 कोटींची कमाई केली होती. टीव्हीवर रिलीज झाल्यानंतर चित्रपट आणखी हिट झाला होता. पण चित्रपट यशस्वी झाल्यानंतरही गिरीश कुमारने आणखी एका चित्रपटानंतर बॉलिवूडला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला होता. 

लवशुद्ध हा त्याचा दुसरा चित्रपट होता. यानंतर गिरीश कुमारने वयाच्या 27 व्या वर्षी बॉलिवूडमधू एक्झिट केली होती. लवशुद्ध चित्रपट रिलीज होणार असतानाच गिरीश कुमारने त्याची बालपणीची मैत्रीण कृष्णाशी लग्न केलं. गिरीश कुमारने लग्न करताना त्यांची जाहीर वाच्यता केली नाही. त्याने सोशल मीडियावर पोस्टही शेअर केली नव्हती. 2017 मध्ये त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत अखेर खुलासा केला होता. 

आपलं करिअर वाचवण्यासाठी मी हे केलं होतं. कारण विवाहित असल्याचा टॅग माझ्या रोमँटिक हिरो भूमिकेला तडा देणारा ठरला असता. “कृष्णा थोडी घाबरली होती पण तिला माझ्या करिअरचं रक्षण करण्याची गरज समजली. पण आता मला जगासमोर जाहीर करायचं आहे आणि माजं प्रेम अधिकृतपणे सांगायचं आहे," असं अभिनेत्याने सांगितलं. 

ब़ॉलिवूडनंतर गिरीश कुमारचं करिअर कसं आहे?

गिरीश हा टिप्स इंडस्ट्रीजचे सहमालक आणि चित्रपट निर्माता कुमार तौरानी यांचा मुलगा आहे. 2016 मध्ये अभिनय सोडल्यानंतर, गिरीशने त्याचे वडील आणि काका रमेश तौरानी यांच्यासह टिप्स कंपनी हाताळण्यास सुरुवात केली. तो सध्या टिप्स इंडस्ट्रीजमध्ये चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) म्हणून काम करतो. 4700 कोटींच्या संपत्तीचा तो वारसदार आहे. पडद्यामागे काम करताना, गिरीश पोन्नियिन सेल्वन आणि मेरी ख्रिसमस सारख्या चित्रपटांच्या मार्किटिंग आणि प्रोडक्शनमध्ये सहभागी होता.