'...त्यामुळे मंडीतील लोकांनी माझी निवड केली', कंगना रणौत यांनी सांगितले विजयाचे गुपित

"मी गँगस्टर चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर मला तिकीटासाठी विचारणा झाली होती", असेही कंगना यावेळी म्हणाली.

Updated: Jun 13, 2024, 06:32 PM IST
'...त्यामुळे मंडीतील लोकांनी माझी निवड केली', कंगना रणौत यांनी सांगितले विजयाचे गुपित title=

Kangana Ranaut Politicians Life : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत या आता खासदार झाल्या आहेत. कंगना यांनी हिमाचल प्रदेशातील मंडीमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. चित्रपटसृष्टीनंतर आता राजकीय इनिंग सुरु करणाऱ्या कंगनाने आता दोघांपैकी कोणती गोष्ट अवघड वाटते, याबद्दल भाष्य केले आहे. 

कंगनाने नुकतंच 'हिमाचल पॉडकास्ट'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत कंगनाने राजकारण आणि अभिनय याबद्दल भाष्य केले आहे. यावेळी ती म्हणाली, "राजकारणात येण्यासाठी मला अनेकदा संपर्क करण्यात आला. यापूर्वीही मला राजकारणात येण्यासाठी अनेक ऑफर मिळाल्या. मी गँगस्टर चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर मला तिकीटासाठी विचारणा झाली होती. माझे आजोबा तीन वेळा आमदार होते. त्यामुळे जेव्हा तुम्ही अशा कुटुंबातून येता आणि थोडे यशस्वी होता तेव्हा स्थानिक नेते तुमच्याशी संपर्क साधतात. खरंतर ही खूप सामान्य गोष्ट आहे." 

"राजकारणात येण्यासाठी वडिलांना आणि बहिणीलाही ऑफर"

"माझ्या वडिलांनाही राजकारणात येण्यासाठी ऑफर मिळाली होती. ॲसिड हल्ल्यातून वाचल्यानंतर माझ्या बहिणीला राजकारणात येण्याची ऑफर आली. त्यामुळे आमच्यासाठी राजकारणात येण्यासाठी ऑफर केली जाणं ही फार मोठी गोष्ट नाही. जर मला राजकारणाची आवड नसती तर मला इतका त्रास सहन करावा लागला नसता. मी मला जे आवडतं ते करणारी व्यक्ती आहे. मी एक अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका आणि निर्मातीही आहे. त्यामुळे मला राजकीय करिअरमध्येही इथल्या लोकांशी जुळवून पुढे जावं लागेल, असे कंगना रणौतने म्हटले. 

"राजकारण अवघड काम"

"याबद्दल कोणतीही सक्ती नाही. पण एक नक्की की राजकारणापेक्षा चित्रपटसृष्टीत काम करणं तुलनेने सोपं आहे, हे मी नाकारणार नाही. राजकारणातील आयुष्य डॉक्टरांप्रमाणेच कठीण आहे. या ठिकाणी फक्त समस्या असलेले लोक भेटायला येतात. जेव्हा तुम्ही चित्रपट पाहायला जातात, तेव्हा तुम्ही खूप निवांत असता. पण राजकारण असं नाही. मी राजकारणाकडे फक्त ब्रेक म्हणून बघत नाही. हे खूप अवघड काम आहे. पण मी त्यासाठी तयार आहे," असे कंगना रणौत म्हणाल्या. 

"मी त्यांना निराश करणार नाही"

“मला वाटतं की जर देवाने मला ही संधी दिली आहे तर मी ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन. मंडीतील लोकांना असा नेता हवा आहे जो त्यांना भ्रष्ट लोकांपासून वाचवेल. त्यासाठी त्यांनी मला निवडलं. त्यामुळे मी त्यांना निराश करणार नाही, असे कंगना रणौतने म्हटले.