दीपिका पदुकोणला निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाही? जाणून घ्या सत्य

दीपिकाने तिच्या पासपोर्टबाबत असलेल्या अफवांवर खुलासा केला होता. 

Updated: Apr 27, 2019, 04:14 PM IST
दीपिका पदुकोणला निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाही? जाणून घ्या सत्य  title=

मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ साठी चौथ्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी होणार आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार या लोकसभा निवडणुकीत वेगवेगळ्या कारणांमुळे मतदान करु शकत नसल्याचं म्हटलं जातंय. या यादीमध्ये बॉलिवूडची 'मस्तानी' दीपिका पादुकोणच्या नावाचाही उल्लेख केला जातो. दीपिका पादुकोणचा जन्म डेन्मार्कचा असल्यानं तिच्याकडे दानिश पासपोर्ट आहे, तिच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही, अशा आशयाच्या काही बातम्या मीडियातून समोर येत आहेत. त्यामुळेच ती या निवडणुकांमध्ये मतदान करु शकत नसल्याची चर्चा होती. परंतु दीपिका पादुकोण मतदान करु शकत नसल्याच्या बातमीत कोणतंही तथ्य नाही. 

२०१४ साली झालेल्या आयफा (IIFA) पुरस्कार सोहळ्यात दीपिकाने तिच्या पासपोर्टबाबत असलेल्या अफवांवर खुलासा केला होता. तिच्याकडे भारताचा पासपोर्ट असल्याचा खुलासा तिने यावेळी केला होता. पासपोर्टबाबत एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दीपिकाने 'तुमच्याकडे चुकीची माहिती आहे. तुम्हाला अशी माहिती कोणी दिली, कुठून मिळाली?' असा सवालही तिने पत्रकाराला केला होता. आपल्याकडे भारताचा पासपोर्ट असून 'मला भारताची नागरिक असल्याचा अभिमान असल्याचं' तिने या मुलाखतीत म्हटलं होतं. 'IIFA पुरस्कार सोहळ्यात सामील होण्याआधी मी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणार' असल्याचंही तिनं म्हटलं होतं. 

२०१४ साली महाराष्ट्रातील विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीसाठी तिने मतदान केल्याचा फोटोही दीपिकानं सोशल मीडियावरून शेअर केला होता.