मुंबई : महाराष्ट्राचे लाडके भाऊजी अभिनेते आदेश बांदेकर यांच्या कारला काही दिवसांपूर्वी अपघात झाला. मात्र सुदैवाने ते या अपघातातून बचावले. सिद्धिविनायक मंदिराच्या वतीने एक कोटींचा धनादेश कोल्हापुरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यासाठी ते चालले होते. त्यावेळी पुढच्या ट्रकमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने बांदेकरांची मागून येणारी गाडी त्यावर आदळली. गाडीचा पुढचा भाग चेपला गेला. तेव्हाच कारचा टायर फुटला आणि अपघात झाला.
मात्र आदेश बांदेकरांनी सीट बेल्ट लावलेला असल्यामुळे त्यांनी कोणतीही दुखापत झाली नाही. या अपघातानंतर दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले की, सीट बेल्ट लावण्याचे आवाहन नेहमी केले जाते. पण ते किती महत्त्वाचे आहे ते मी अपघातामुळे अनुभवले. त्यामुळे गाडीने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाने सीट बेल्ट लावणे गरजेचे आहे, असे मला वाटते.
होम मिनिस्टर या कार्यक्रमामुळे घराघरात पोहचलेले आदेश बांदेकर सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष असून ते शिवसेनेचे नेते देखील आहेत.