Aamir Khan-Kiran Rao Divorce : बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट, अर्थात अभिनेता आमिर खान (Ammir Khan) आणि त्याची पत्नी किरण राव यांची जोडी 'परफेक्ट कपल' म्हणून संबोधली जात असतानाच या जोडीच्या नात्यात दुरावा आला आहे. जवळपास 15 वर्षांच्या वैवाहिक नात्यानंतर अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी हे नातं संपुष्टात आणलं आहे. शनिवारी या दोघांनीही त्यांच्या या निर्णयाची अधिकृत घोषणा केली.
Actor Aamir Khan and his wife Kiran Rao, in a joint statement announce divorce after 15 years of marriage.
The couple said, "We would like to begin a new chapter in our lives - no longer as husband and wife, but as co-parents and family for each other." pic.twitter.com/gnQd2UPLTZ
— ANI (@ANI) July 3, 2021
नात्यातून विभक्त होत असताना आमिर- किरणनं एकत्र व्यक्त केल्या भावना...
'या 15 वर्षांच्या सुंदर प्रवासामध्ये आम्ही आयुष्यभरासाठी स्मरणात रहावेत असे अनुभव घेतले, आनंदाच्या क्षणांचे साक्षीदार झालो, खुप हसलो. आमचं नातं प्रेम, विश्वास आणि आदर यांच्याच बळावर आणखी खुललं. आता आम्हाला आमच्या नात्याची नवी सुरुवात करायची आहे. पण, पती- पत्नी म्हणून नव्हे, तर एका मुलाचे पालक म्हणून आणि एकमेकांचे कौटुंबीक सदस्य म्हणून. काही काळापूर्वीच आम्ही ठरवल्याप्रमाणं विभक्त झालो होतो. वेगळे राहत होतो, त्याचवेळी एका कुटुंबातील सदस्य आपले अनुभव, घटना एकमेकांना सांगतात तसंच सर्व सुरु होतं.', असं आमिर आणि किरणनं आपल्या नात्याचा शेवट करताना म्हटलं.
आमिर आणि किरण हे दोघंही त्यांचा मुलगा आझाद याच्या संगोपनाची जबाबदारी घेत आहेत. त्यासंदर्भातही त्यांनी या अधिकृत पत्रकात लिहिलं. 'आझादप्रती आणि दोघंही तितके समर्पक आहोत. त्याचं संगोपन आम्ही दोघंही करणार आहोत. चित्रपट, पानी फाऊंडेशन आणि इतर प्रोजेक्टवर आम्ही एकत्र काम करणं सुरुच ठेवणार आहोत.'
नात्यात आलेल्या या बदलाचा स्वीकार करत आपल्याला साथ देणाऱ्या मित्रमंडळी आणि कुटुंबीयांचे आमिर आणि किरणनं आभार मानले. नात्यात या वळणावर त्यांची साथ तितकीच महत्त्वाची होती, असं म्हणत त्यांनी सर्वांकडूनच पुढच्या जीवनासाठी सदिच्छांची अपेक्षा केली. हा घटस्फोट म्हणजे शेवट नसून एका नव्या प्रवासाटी सुरुवात आहे, असं म्हणत या वैवाहिक नात्याला त्यांनी पूर्णविराम दिला.