मुंबई : बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगचा जन्म ६ जुलै १९८५ मध्ये मुंबईत झाला. रणवीरचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. बॉलिवूडमध्ये येण्याआधी त्याने आपले नाव फक्त रणवीर सिंगच ठेवले. इतकंच नाही तर तो त्याचे नावही बदलू इच्छित होता कारण रणबीर आणि रणवीरमध्ये बरेच साम्य आहे. पण नंतर त्याने हा विचार बदलला. रणवीर सिंग आणि अनिल कपूरचे खास नाते आहे. कारण रणवीरचे वडील आणि अनिल कपूरची पत्नी सुनीता कपूर हे चुलत भाऊ बहीण आहेत.
सिनेमात पर्दापण करण्यासाठी रणवीर सिंगला मोठा संघर्ष करावा लागला आणि खूप वाटही पाहावी लागली. रणवीर अमेरिकेत मास कम्यूनिकेशनचे शिक्षण घेण्यासाठी गेला होता. कंटेंट रायटर बनण्याची इच्छा असणारा रणवीर अभिनेता झाला. मास कम्यूनिकेशनच्या पहिल्याच क्लासमध्ये दीवार सिनेमाचा डायलॉग बोलल्यावर त्याचे जबरदस्त कौतुक झाले. त्यानंतर रणवीर खूप भारावून गेला आणि त्याने अभिनेता होण्याचे ठरवले. अमेरिकेतून परत आल्यावर त्याला ३ वर्ष काम मिळवण्यासाठी स्ट्रगल करावा लागला. याच स्ट्रगलच्या काळात त्याने असिस्टेंट डिरेक्टर म्हणून काम केले. पण त्याला अभिनय करायचा होता.
त्यानंतर रणवीरने थिएटर करणे सुरु केले. पण तिथेही त्याला बॅक स्टेजचे काम देण्यात आले. तिथे तो अगदी छोटी मोठी कामं करत असे. चहा आणणे, सीट लावणे, रिहर्सल करुन घेणे, अशी कामे तो करत होता. मग त्याने थिएटर करता करता फिल्म इंडस्ट्रीमध्येही काम शोधायला सुरुवात केली.
आदित्य चोप्राने रणवीर सिंगला पहिला ब्रेक दिला. २०१० मध्ये आलेला त्याचा पहिला सिनेमा बॅंड बाजा बारात सुपरहीट ठरला. यापूर्वी रणवीरला तीन सिनेमांच्या ऑफर आल्या होत्या पण त्या त्याने नाकारल्या. त्यानंतर रामलीला, गुंडे, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत यांसारखे सुपरहीट सिनेमे त्याने दिले. आता रणवीर रोहीत शेट्टीच्या सिम्बा, कबीर खानच्या '1983 द फिल्म' आणि जोया अख्तरच्या 'गली बॉय' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.