Eknath Shinde vs Aaditya Thackeray: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सुपुत्र तसेच वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरेंनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीवरुन आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खोचक शब्दांमध्ये आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या गाठीभेटी वाढल्यात. गेल्या पाच वर्षांत एकमेकांना टाळणाऱ्या फडणवीस ठाकरेंच्या वारंवार गाठीभेटी होऊ लागल्यात. आजही आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने ठाकरेंची शिवसेना आणि भाजप युतीबाबतच्या चर्चा सुरू झाल्या असतानाच एकनाथ शिंदेंनी या भेटीगाठींवरुन खोचक टोला लगावला आहे.
गुरुवारी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासूनची आदित्य ठाकरेंची ही तिसरी भेट ठरली. फडणवीसांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंनी एक सूचक प्रतिक्रिया दिली. "सत्ताधारी आणि विरोधक एकत्र मिळून चांगलं काम करू शकतात," असं आदित्य यांनी म्हटलं. याच भेटीगाठीसंदर्भात एकनाथ शिंदेंना विचारण्यात आलं असता त्यांनी ठाकरेंना सरड्याची उपमा दिली. यावरुन आदित्य ठाकरेंनीही शिंदेंना टोला लगावला आहे.
"हे घटनाबाह्य सरकार, घटनाबाह्य मुख्यमंत्री, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजींना फडतूस म्हणणारे, एक तर तु तरी राहशील नाही तर मी तरी राहील अशी टोकाची भाषा बोलणारे एवढ्या लवकर रंग बदलतील असं वाटलं नव्हतं," असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्यासंदर्भात बोलताना लगावला आहे. "सरडा रंग बदलतो पण अशा प्रकारची नवीन जात मी पहिल्यांदा बघितली," असा टोमणाही शिंदेंनी लगावला.
नक्की वाचा >> 'रुपयाची चड्डी घसरली!' ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल; म्हणाले, 'मोदींनी 10 वर्षांत...'
"लोकांनी त्यांना झिडकारलं. त्यांनी लोकांच्या, बाळासाहेबांच्या, हिंदुत्वाच्या विचारांची प्रतारणा केली. त्यांना जनतेने जागा दाखवून दिली आणि मतदारांनी त्यांचा कचरा केला," असंही शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल प्रतिक्रिया देताना म्हणाले. तसेच पुढे शिंदेंनी, "तुम लढो, हम कपडा सांभालते है तसं तुम लढो, हम बुके देके आते,' हे असं मी एकदा म्हटलं होतं," अशी आठवण करुन दिली.
एकनाथ शिंदेंनी केलेल्या या टीकेसंदर्भात पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारला असता त्यांनी शिंदेंवर निशाणा साधला. "त्यांनी आरश्यात पाहिलं का? सरडा पण लाजेल. ते डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाहीत," असं प्रत्युत्तर आदित्य यांनी शिंदेंना दिलं आहे. "डरपोक लोक. त्यांनी लाज राखावी. थोडीतरी लाज बाळगावी," असं म्हणत आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्र्यांना टोला लगावला.