बिग बॉस मराठी 5 हा नवा सिझन नुकताच सुरु झाला आहे. या सिझनने अगदी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून काही इन्फ्लुएन्सरचा देखील समावेश आहे. त्यातील एक नाव म्हणजे गोलीगत सूरज चव्हाण.
गुलीगत धोका रिल स्टार सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात स्वतःची ठाम अशी जागा निर्माण करत आहे. घरातील स्पर्धकांसोबत सूरज चव्हाण प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. पण सूरजचा इथपर्यंतचा प्रवास वाटतो तितका सोपा अजिबात नाही. आतापर्यंत त्याच्या दिसण्यामुळे, बोबड्या बोलण्यामुळे अनेकांनी हिणवलं आहे. त्याच्या कुटुंबियांनी देखील हा अनुभव सांगितला. पण सूरज कधीच थकला नाही. तो कायमच ठामपणे उभा राहिला.
दिग्दर्शक आणि लेखक अक्षय इंडीकर यांनी सूरज चव्हाणकरिता एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट जुनी असली तरीही त्यातील मजकूर मात्र आजही तंतोतंत पटेल असा आहे. एका रोल च्या पल्याड जाऊन मला तरी सूरज चव्हाण हा एका सिनेमाचा, बायोपिकचा विषय वाटतो, असं अक्षय यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
कुणी स्वतःला कुणी ज्ञानाला कुणी बापजाद्याला कुणी हुंडा घेऊन तुंबडी भरून लग्न बाजाराला
जगण्याच्या पराकोटीच्या लढाईत जर सूरज चव्हाण उतरून खेळायचं ठरवत असेल तर काय बिघडलं ? त्याला माहितीय तो काळाय ,त्याला माहितीय तो बोबडा आहे ,त्याला हे नीट माहिती आहे कि तो व्यंगासोबत न्यूनगंडात जिंदगीची काही वर्षे घालवून कफ्फलक होऊन जगलाय . World is flat च्या जमान्यात जग एका प्रतलावर आलं . इंटरनेट ने कुणाचीच एकहाती मक्तेदारी मनोरंजनाच्या जगावर असू शकत नाही याची ग्वाही दिली . मनोरंजन किती उथळ किती दर्जेदार याचे निकष ठरवण्याच्या फुटपट्टीच्या मालकीचा पारंपरिक अधिकार कुणाजवळ राहिला ठेवला गेला ह्याचं ज्ञान आपल्याला आहेच .मनोरंजन रंजयते इति अशी काहीशी संस्कृत व्याख्या . आता कुणाला कशातून मिळत असेल ? स्ट्रगल ,हिरो होणं हे ख्वाब ह्या गावकुसातल्या पोरांनी कधी बघायचं ? बघायला शिकवलं इंटरनेट ने . बापा काका मामाच्या आयत्या फ्लॅट वर मुंबईत जाऊन सूरज चव्हाण ऑडिशन देत उपाशी पोटी डाएट करून जिम करून जगणार होता का ? जिंदगीच्या नशिबात मनी असून देखील जाता येणार न्हवतंच . त्याला काही केल्या त्याच्या भवतालला अर्थ द्यावा वाटत असणार . कुठल्या तरी भुरट्या नेत्याच्या मागं वर्ष बरबाद करण्यापेक्षा पण त्याला वाटलं छोटे व्हिडीओ करावेत . केले आवडले नावडले . संख्येच्या अल्गोरिदम च्या बाजारात व्हियूज च्या नंबरच्या खेळात स्वतःला सिद्ध केलं . कुणी कितीही नाकं मुरडूदेत पण त्याला हे हवंय ते करत रहाण्याची आणि मुख्य म्हणजे न्यूनगंडाला स्वतःचा आत्मविश्वास बनवण्याची जीवघेणी कसरत करत सिनेमात अभिनय करतोय अशी बातमी वाचली . एका रोल च्या पल्याड जाऊन मला तरी सूरज चव्हाण हा एका सिनेमाचा बायोपिक चा विषय वाटतो . न्यूनगंडाने ग्रासलेल्या शंभरातील नव्व्याणव लोकांचा ननायक .
खूप खूप अभिनंदन सूरज
टीप : हि पोस्ट त्याच्या अभिनयाबद्दल नाही
-अक्षय इंडीकर ( लेखक ,दिगदर्शक )
दिग्दर्शकाच्या या पोस्टनंतर सूरज चव्हाणचं भरभरून कौतुक होत आहे.