Prajakta Mali After Suresh Dhas Apologise : भाजपा आमदार सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतलं. यानंतर प्राजक्ता माळीनं थेट पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला. या सगळ्यात तिनं महिला आयोग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संबंधीत तक्रार केली. याशिवाय तिनं सुरेश धस यांनी माफी मागावी असं देखील म्हटलं होतं. सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विषय संपवल्याचं सांगत अखेर माफी मागितली. तर आता या सगळ्यात स्वत: प्राजक्ता माळीनं देखील प्रतिक्रिया दिला आहे.
प्राजक्तानं या प्रकरणी तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत प्राजक्ता म्हणाली की, 'तुम्हाला सगळ्यांना माझा नम्रता पुर्वक नमस्कार, संपूर्ण महाराष्ट्राचे मी आभार मानते. पत्रकार परिषदेनंतर मला सगळ्यांनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारे पाठिंबा दिला. महिलांच्या सन्मानासाठी समाजातल्या सर्व स्तरांवरून आवाज उठवण्यात आला. पाठिंबा दिला गेला, समर्थन करण्यात आलं. त्यामुळे आम्हाला प्रचंड बळ मिळालं. समाधान वाटलंय. त्यासाठी धन्यवाद. त्यासोबत माननिय आमदार सुरेश धस यांचे मनापासून आभार मानते. त्यांनी अत्यंत मोठ्या मनानं त्यांनी देखील समस्त महिला वर्गाची माफी मागितली, दिलगीरी व्यक्त केली आहे. दादा खूप धन्यवाद. असं करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहेत हे दाखवून दिलं. महिलांच्या सन्मासाठी छत्रपतींची भूमिका किती कठोर होती, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. ही छत्रपतींची भूमी आहे आणि त्यांचे विचार हे पुढे चालवले जातील हे तुम्ही या कृतीतून दाखवून दिलं आहे. धन्यवाद'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांचे आभार मानत प्राजक्ता माळी पुढे म्हणाली, 'माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांचे मनापासून आभार. त्यांनी यात जातीनं लक्ष घातलं आणि अत्यंत संवेदनशीलपणे हा विषय मार्गी लावला. मनापासून धन्यवाद.'