Rename Kashmir : काश्मीरचं नाव बदलणार? शाहंनी उल्लेख केलेले ऋषी कश्यप आहेत तरी कोण?

Amit Shah Kashmir Speech: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी  नुकतंच एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी थेट काश्मीर मुद्द्यावर वक्तव्य केलं...   

सायली पाटील | Updated: Jan 3, 2025, 02:17 PM IST
Rename Kashmir : काश्मीरचं नाव बदलणार? शाहंनी उल्लेख केलेले ऋषी कश्यप आहेत तरी कोण? title=
who was rishi kashyap as amit shah suggested his name to kashmir

Amit Shah Kashmir Speech: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अतिशय महत्त्वाचं वक्तव्य करत काश्मीरमधून किंबहुना देशातूनच दहशतवादाचा नायनाट करण्यासमवेत इतिहासात डोकावत एक लक्षवेधी वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर काश्मीर, काश्मीरचं अस्तित्वं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काश्मीरचं नाव हे मुद्दे चर्चेत आले. 

'जम्मू-कश्मीर अँड लद्दाख थ्रू द एजेस' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी शाह यांनी हजेरी लावली होती, जिथं त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले. काश्मीरला कश्यप भूमी म्हणून ओळखलं जातं, असं शाह म्हणाले आणि त्या क्षणापासून हे कश्यप ऋषी नेमके कोण होते याचीच चर्चा सुरू झाली. 

कोण होते ऋषी कश्यप? 

ऋषी कश्यप हे ब्रह्मदेवतेचे मानसपुत्र मरीचिचे पुत्र होते. कला असं त्यांच्या आईचं नाव. ऋषी कश्यप यांच्या 17 पत्नी होत्या ज्यापैकी 13 पत्नी दक्ष प्रजापतीच्या मुली असल्याची आख्यायिका आहे. याच पत्नींपासून मानसपुत्रांचा जन्म झाला होता. 

कश्यप ऋषी कश्यप संहिता, स्मृति ग्रंथ इत्यादी ग्रंथांचे रचनाकार म्हणूनही ओळखले जातात. प्राचीन ग्रंथांमध्ये आढळणाऱ्या संदर्भांनुसार कश्यप ऋषींना काश्मीरमध्येच ध्यानधारणा केली होती. त्यामुळंच काश्मीरचं नाव त्यांच्या नावावरूनच मिळालं असावं असाही कयास काही मंजळी लावतात. काश्मीरच्या पहिल्या राजाचं नावही महर्षी कश्यप असंच होतं. हा तोच काळ होता जेव्हा इथं कश्यप समाज वावरत होता. 

हेसुद्धा वाचा : 2025 मधील सर्वात मोठी बातमी! मोदी सरकार 'काश्मीर'चं नाव बदलणार? शाहांनी सांगितलं नवं नाव

 

शाह काश्मीरविषयी काय म्हणाले? 

काश्मीरचा संपूर्ण भारताशी असणारा संबंध पाहता त्याविषयी अमित शाह म्हणाले, भारत हा एकमेव असा देश आहे जो प्रत्यक्षात भू सांस्कृतिक आहे. या देशाच्या सीमा संस्कृतीच्या आहेत. शाह यांच्या वक्तव्यानुसार 'सिल्क रुट'पासून मध्य आशियापर्यंत, शंकराचार्य मंदिरापासून हेमिस मठापर्यंत, व्यापारापर्यंत अध्यात्मापर्यंत साऱ्याचाच भक्कम पाया काश्मीरच्या संस्कृतीमध्ये आढळतो. 

शासकांची मर्जी राखण्यासाठी लिहिण्यात आलेल्या इतिहासापासून मुक्त होण्याची वेळ आता आली आहे असं म्हणत तत्थ आणि प्रत्यक्ष साक्षीच्या आधारे भारताचा इतिहास जगापुढं आणण्याची वेळ आली आहे या वक्तव्यावर त्यांनी जोर दिला. शाह यांनी संबोधनपर भाषणात अनेक गोष्टी अधोरेखित केल्या असल्या तरीही काश्मीरच्या नामांतराचाच मुद्दा राजकीय वर्तुळातही चर्चेचाच विषय ठरला.