'...अन् मी नम्रपणे माफी मागून मराठीत बोलू लागले', हेमांगी कवीची 'ती' पोस्ट चर्चेत

हेमांगीला झी वाहिनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'झी रिश्ते अवॅार्डस् 2024' मध्ये सर्वोत्कृष्ट आई अर्थात Best Maa या श्रेणीत पुरस्कार मिळाला. 

Updated: Feb 22, 2024, 08:41 PM IST
 '...अन् मी नम्रपणे माफी मागून मराठीत बोलू लागले', हेमांगी कवीची 'ती' पोस्ट चर्चेत title=

Hemangi Kavi won zee rishtey award : मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून हेमांगी कवीला ओळखले जाते. सध्या हेमांगी ही एका हिंदी मालिकेत झळकत आहे. ‘कैसे मुझे तुम मिल गयी’ असे तिच्या हिंदी मालिकेचे नाव आहे. यात ती भवानी चिटणीस हे पात्र साकारत आहे. यासाठी तिला सर्वोत्कृष्ट आई या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी पुरस्कार स्वीकारतानाचा एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी तिने मराठीत संवाद साधला. 

हेमांगी कवी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच हेमांगीला झी वाहिनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'झी रिश्ते अवॅार्डस् 2024' मध्ये सर्वोत्कृष्ट आई अर्थात Best Maa या श्रेणीत पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्वीकारतानाचा एक व्हिडीओ हेमांगीने पोस्ट केला आहे. या व्हिडीओत हेमांगीला पुरस्कार जाहीर होतो आणि ती भावूक होऊन तो स्वीकारण्यासाठी मंचावर जाते. ती "हा पुरस्कार स्वीकारताना मला खरंच वाटलं नव्हतं की हा पुरस्कार मला मिळेल आणि जेव्हा... मला माफ करा मी मराठीत बोलले", असे म्हणते. त्यावेळी तिच्या समोरुन जय महाराष्ट्र अशी घोषणा ऐकू येते. याबद्दल तिने भावना व्यक्त केल्या आहेत. 

हेमांगी कवी काय म्हणाली?

"काल मातृभाषा दिन होता आणि कालच मला झी रिश्ते अवॅार्डस् २०२४ मध्ये माझ्या ‘कैसे मुझे तुम मिल गए’ या हिंदी मालिकेतल्या ‘भवानी चिटणीस’ या व्यक्तीरेखेसाठी ‘Best Maa’ चा पुरस्कार मिळाला! माझ्यासाठी हा एक सुखद धक्काच होता. रंगमंच्यावर गेल्यावर कळेना कुठल्या भाषेत माझ्या भावना व्यक्त कराव्या कारण समोर बसलेले बहुतांश लोक हिंदी भाषिक होते. मला हे माहीत असतानाही माझ्या तोंडून माझी मातृभाषा आली. 

ऐकणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मी नम्रपणे माफी मागून मराठीत बोलू लागले आणि जेव्हा समोरून ‘जय महाराष्ट्र’ ऐकू आलं तेव्हा तर उर भरून आला, बळ मिळालं! त्यानंतर ज्या प्रकारे अर्जुन बिजलानी आणि हर्ष लिंबाचिया ने मराठीत बोलल्यावर प्रोत्साहन दिलं तेव्हा तर आहाहा खूपच भारी वाटलं! रंगमंच्यावरून खाली आल्यानंतर बऱ्याच हिंदी भाषिक कलाकारांनी मी मराठीत व्यक्त झाल्याचं कौतुक केलं! आपलं आपल्या भाषेवर अतोनात प्रेम असलं की आपण दुसऱ्या भाषेवर ही तितकंच प्रेम करतो! आपल्या मराठी भाषेला मिळालेलं प्रेम पाहून कायच्या काय भारी वाटतंय! जय महाराष्ट्र!", असे हेमांगी कवीने म्हटले आहे. 

हेमांगीने या सोहळ्याचे अनेक फोटोही शेअर केले आहेत. सध्या हेमांगी ही ‘कैसे मुझे तुम मिल गए’ या हिंदी मालिकेत झळकत आहे. ही मालिका झी टीव्ही या हिंदी वाहिनीवर झळकत आहे.  यात ती भवानी चिटणीस हे पात्र साकारत आहे. याआधीही तिने अनेक मराठी आणि हिंदी मालिकेत काम केले आहे. हेमांगी ‘अवघाचि संसार’, ‘मन धागा धागा जोडते नवा’, ‘वादळवाट’, ‘लेक माझी दुर्गा’, ‘मिसेस मुख्यमंत्री’ यासारख्या अनेक मराठी मालिकांमध्ये झळकली. ती अभिनेत्री सुश्मिता सेनच्या ताली वेबसीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली होती.