'तो आता माणूस म्हणून...', अभिजीत भट्टाचार्यने सांगितलं शाहरुखसाठी न गाण्याचं कारण, 'इतका अहंकार...'

बॉलिवूड गायक अभिजीत भट्टाचार्यने शाहरुख खानसाठी गाणी गाणं बंद का केलं? यामागील कारण सांगितलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 5, 2024, 03:59 PM IST
'तो आता माणूस म्हणून...', अभिजीत भट्टाचार्यने सांगितलं शाहरुखसाठी न गाण्याचं कारण, 'इतका अहंकार...' title=

अभिजीत भट्टाचार्यची (Abhijeet Bhattacharya) गणना 1990-2000 च्या दशकातील प्रसिद्ध गायकांमध्ये केली जाते. खासकरुन शाहरुख खान (Shahrukh KHan) आणि अभिजीत ही जोडी जास्त गाजली. मात्र आता अभिजीत भट्टाचार्य शाहरुख खानसाठी अजिबात गाणी गात नाही. यामागे नेमकं काय कारण आहे याचा उलगडा नुकताच अभिजीत भट्टाचार्यने एका मुलाखतीत केला आहे. दोघांमध्ये अद्यापही एकमेकांबद्दल नाराजी आहे का हेदेखील गायकानं उघड केलं आहे. 

ANI ला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत भट्टाचार्यने सांगितलं की, आपल्या कामाचं योग्य श्रेय दिलं जात नसल्याचं वाटू लागल्यानंतर शाहरुख खानसह वाद सुरु झाले. शाहरुख खानसाठी गाणं बंद का केलं? यामागील कारण सांगताना अभिजीत म्हणाला की, "जेव्हा तुमचा स्वाभिमान दुखावला जातो तेव्हा तुम्हाला आता हे बास झालं असं सांगावं वाटतं. मी त्याच्यासाठी गात नव्हतो. मी माझ्या कामाचा भाग म्हणून गात होता. पण नंतर मी पाहिलं की, ते इतर सर्वांना लोकांना चहा पाजणाऱ्याप्रमाणे पाहत आहेत. त्यानंतर मला वाटलं की, मग मी तुमचा आवाज का व्हावं?".

शाहरुख खानने त्यांच्यातील मतभेदानंतर कधी समेट करण्याचा प्रयत्न केला का असं विचारले असता, अभिजीत भट्टाचार्यने सांगितलं की, “माझं शाहरुखसोबतचं नातं तुटलं असं नाही. पण शाहरुख आता इतका मोठा स्टार आहे की तो आता फक्त एक माणूस राहिला नाही. तो कोणत्या स्तरावर पोहोचला आहे हे कदाचित त्यालाही कळत नाही. मग मी त्याच्याकडून कशाची अपेक्षा करू? मी अजूनही तीच व्यक्ती आहे जी मी होतो. मी माझ्या पद्धतीने प्रगती करत आहे. मी त्याच्यापेक्षा 5-6 वर्षांनी मोठा आहे. त्याचे वय 60 पेक्षा जास्त आहे आणि मी देखील साठीत आहे. कुणाची माफी मागायची गरज नव्हती. आपल्या दोघांमध्ये अहंकार आहे. आमचे वाढदिवस फक्त एक दिवसाच्या अंतराने आहेत. आम्ही दोघे वृश्चिक आहोत. पण मी मोठा वृश्चिक आहे. मला त्याची किंवा त्याच्या आधाराची गरज नाही.”

अभिजीत भट्टाचार्यने शाहरुख खानच्या अनेक सुपरहिट गाण्यांना आवाज दिला आहे. यामध्ये बादशाहमधील ‘वो लड़की जो सबसे अलग है’, ‘तुम्हे जो मैने देखा’ ते चलते चलतेच्या शीर्षक गीतांचा समावेश आहे.

अलीकडेच, दुआ लिपाने तिच्या मुंबई कॉन्सर्टमध्ये वो लडकी जो मॅशअपवर परफॉर्म करून सर्वांना आश्चर्यचकित केले. मात्र, 'वो लडकी जो'चे गायक अभिजीत भट्टाचार्यने त्यांच्या कामाचं श्रेय न मिळाल्याबद्दल निराशा व्यक्त केली. दुआचा परफॉर्मन्स व्हायरल झाल्यानंतर त्यांचा मुलगा जय भट्टाचार्य यानेही त्याच्या इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहिली आणि आपल्या वडिलांना श्रेय दिलं जात नसल्याबद्दल नाराजी जाहीर केली.