punjab elections 2022 : पंजाबमध्ये पंचरंगी लढतीचा फायदा कोणाला?

पंजाबच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच मतदारांपुढे दोनपेक्षा अधिक सक्षम पर्याय असल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मात्र, ते मतदार कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकतात हे १० मार्चलाच स्पष्ट होईल.  

Updated: Jan 31, 2022, 10:31 PM IST
punjab elections 2022 : पंजाबमध्ये पंचरंगी लढतीचा फायदा कोणाला? title=

धनंजय शेळके, प्रतिनिधी, झी २४ तास, मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये पंजाबचं राजकारण काँग्रेस (Congress) आणि अकाली दल (Shiromani Akali Dal ) यांच्याभोवती फिरत होतं. गेली १० वर्ष काँग्रेस सत्तेवर होती. त्याआधी शिरोमणी अकाली दल आणि भाजप ( BJP ) यांचं युती सरकार सत्तेत होतं. यंदा मात्र सत्तेसाठी दावेदारी करण्यासाठी पाच पक्ष किंवा आघाड्या मैदानात उतरल्या आहेत. या पंचरंगी लढतीचा फायदा कोणाला होणार याची उत्सुकता लागली आहे.

गेल्या १० वर्षांपासून काँग्रेस सत्तेत आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग ( Captain Amarinder Singh ) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं जवळपास साडेनऊ वर्षांचा कालावधी पूर्ण केला. मात्र, नवज्योतसिंग सिद्धू ( Navjot Singh Sidhu ) यांची काँग्रेसमध्ये एन्ट्री झाल्यानंतर सिद्धू आणि कॅप्टन यांचे खटके उडू लागले. दोघांचे वाद आणि १० वर्षांची अँन्टीइम्बन्सी यामुळे काही महिन्यांपूर्वी काँग्रेसनं राज्यात खांदेपालट केली. अमरिंदरसिंग यांच्या जागी काँग्रेसनं चरनजितसिंग चेन्नी ( Charanjit Singh Channi ) या दलित नेत्याला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवलं. मुख्यमंत्री चेन्नी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवजोतसिंग सिद्धु यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सत्त्तेची हॅट्ट्रीक करण्यासाठी मैदानात उतरली आहे.

पंजाबच्या राजकारणात गेल्यावेळी आम आदमी पार्टीची ( Aam Adami Parti ) जोरदार एन्ट्री झाली होती. मात्र, सत्तेपर्यंत त्यांना पोहचता आलं नाही. तरीही अकाली दल आणि भाजप यांना मागे टाकत आप पंजाब विधानसभेतला मुख्य विरोधी पक्ष झाला. आता यावेळी सत्ता मिळवण्याची स्वप्न पहात आप पुन्हा रिंगणात उतरला आहे. गेली पाच वर्ष विधानसभेत आणि बाहेरही आपनं चोख कामगिरी बजावली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपनं पंजाबच्या मतदारांना त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असावा यावर मतं मागितली होती. त्यामध्ये सर्वाधिक पसंती आपचे एकमेव खासदार भगवंत मान ( Bhangvant Man ) यांना मिळाली आहे. मान यांच्या नेतृत्वाखाली आप सत्तास्पर्धेत उतरली आहे. आप आणि काँग्रेस यांच्यातच मुख्य लढत असल्याचं बोललं जातंय.

तीन कृषी कायद्याच्या मुद्यावरुन शिरोमणी अकाली दल आणि भाजप यांच्यात वितुष्ट आलं. अकाली दल केंद्रातील सत्तेतूनही बाहेर पडलं आणि भाजपशी युती तोडली. अर्थात त्याशिवाय त्यांना गत्यंतरही नव्हतं. त्यामुळे यंदा अकाली दलनं नवा मित्र जोडला आहे. हा नवा मित्र आहे बसपा ( BSP ). राज्यात जवळपास ३० टक्के असलेला दलित समाज डोळ्यासमोर ठेऊन अकाली दलनं बसपाशी युती केलीय. केंद्रात भाजपसोबत युतीत ते गेली ८ वर्ष असले तरी पंजाबमध्ये अकाली दल १० वर्ष सत्तेबाहेर आहे. त्यामुळे आता या नव्या युतीला पंजाबची जनता कसा प्रतिसाद देते हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.

'शत्रूचे शत्रू ते आपले मित्र' या न्यायानं भाजप आणि कॅप्टन अमरिंदर सिंग एकत्र आले आहेत. काँग्रेसशी फिस्कटल्यानंतर कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पंजाब लोक काँग्रेस नावाच्या पक्षाची स्थापना केली आहे. कॅप्टन यांचा पक्ष, भाजप आणि सुखदेवसिंग धिंडसा ( Sukhdev Singh Dhindsa ) यांचा शिरोमणी अकाली दल संयुक्त या तीन पक्षांनी एकत्र येत मैदानात उडी घेतली आहे.

तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी तब्बल दीड वर्ष आंदोलन करणारे शेतकरी संघटनाही या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करुन केंद्र सरकारला माघार घ्यायला लावणारे हे शेतकरी पुत्र आता निवडणुकीच्या आखाड्यात कशी कामगिरी करतात ते पहावं लागेल. निवडणुकीत ते यशस्वी होतात की त्यांच्यामुळे त्यांच्या मुख्य विरोधक असलेल्या भाजपला फायदा होते ते निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल. पंजाबच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच मतदारांपुढे दोनपेक्षा अधिक सक्षम पर्याय असल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मात्र, ते मतदार कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकतात हे १० मार्चलाच स्पष्ट होईल.