सिमरनच्या निमित्ताने...

कंगनांचा हा प्रवास एकटीचा आहे...आपण स्वत:च एक ब्रँण्ड असल्यांचं बॉक्स ऑफिसवर वारंवार तीने सिद्धही केलंय..चित्रपटगृहात एकहाती गर्दी खेचण्याची ताकत या पहाडी मुलीत आहे ... आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खाजगी आयुष्य चव्हाट्यावर आणणारी कंगना तशी “ हिरोईन “ नक्कीच नाही, तशी तिला गरजही नाही. मणिकर्णिका चित्रपटाच्या निमित्ताने वाराणसीत गेलेल्या कंगनावर लिहिलेला हा ब्लॉग

Updated: Sep 17, 2017, 01:02 PM IST
सिमरनच्या निमित्ताने... title=

पूनम नार्वेकर, झी मीडिया, मुंबई : कंगनांचा हा प्रवास एकटीचा आहे...आपण स्वत:च एक ब्रँण्ड असल्यांचं बॉक्स ऑफिसवर वारंवार तीने सिद्धही केलंय..चित्रपटगृहात एकहाती गर्दी खेचण्याची ताकत या पहाडी मुलीत आहे ... आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खाजगी आयुष्य चव्हाट्यावर आणणारी कंगना तशी “ हिरोईन “ नक्कीच नाही, तशी तिला गरजही नाही. मणिकर्णिका चित्रपटाच्या निमित्ताने वाराणसीत गेलेल्या कंगनावर लिहिलेला हा ब्लॉग

पाण्यात राहून माशाशी वैर घेता येत नाही म्हणतात पण कंगना रनौत याला अपवाद आहे, बॉलिवूडमध्ये राहून वर्षानुवर्षे प्रस्थापित लोकांशी वैर घेऊनही या "क्वीन" ने आपली दबंगगिरी कायम ठेवली आहे. अर्थात याला वैर नाही म्हणता येणार.. आपल्यावर होणारे वार ती तेवढ्याच ताकदीने परतवून लावतेय इतकंच. चित्रपटांची कोणतीही पार्श्वभूमी नसताना हिमाचलसारख्या भागातून आलेली बंडखोर पहाडी मुलगी पुन्हा एकदा लढायला सज्ज झालीय ..अर्थात हे युद्ध कोणा व्यक्तीविरोधात नाही तर हे युद्ध आहे रणांगणावरचं...झाशीच्या राणीचं. 'मणिकर्णिका' चित्रपटातून ती लवकरच आपल्या भेटीला येतेय.

'मणिकर्णिका' मधील भूमिकेसाठी कंगनाची तयारी सुरु झालीय. चित्रपटाच्या शूटिंगसाठी वाराणसीत गेल्यानंतर सर्वप्रथम तिने गंगेला साद घातली...गंगाघाटावर आरती करताना आणि गंगेत डुबकी घेउन बाहेर आल्यानंतर तिचा लूक पाहून ती झीशीच्या राणीच्या भूमिकेसाठी सज्ज असल्याचं दिसलं. कपाळावरील लांब कुंकू, नऊवारी साडी आणि
चेह-यावरील कणखर भाव...कंगना म्हणते 'आजपर्यंत ऱाणी झाशीवर चित्रपट येऊ नये याचंच आश्चर्य वाटतं...पण बरं झालं ही भूमिका माझ्याच नशिबी असेल.' कंगना या भूमिकेसाठी जीव तोडून मेहनत घेतेय. तलवारबाजी आणि घोडेस्वारी शिकतेय. इतर भूमिकांप्रमाणेच कंगना या भूमिकेचं सोनं करेल असा विश्वास तिच्या चाहत्यांना आहे.

कंगनांचं करिअर जेमतेम ११ वर्षांचं ...पदार्पणातील गँगस्टर भूमिकेतून ती चर्चेत आली. गॅंगस्टरची प्रेयसी तिने उत्कृष्ट निभावली आणि पदार्पणातील तिच्या अभिनयासाठी थेट फिल्मफेअर पुरस्कारावर छाप उमटवली. मग तिने मागे वळून पाहिलंच नाही..अनेक फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्कार. कारकीर्द संपत आली तरीही केवळ एक राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्यासाठी धडपडणा-या कलाकारांना मागे टाकत कंगना आत्तापर्यंत तब्बल तीन राष्ट्रीय पुरस्कारांची मानकरी ठरली आहे. अर्थात कोणताही वाद न होता...कारण त्या भूमिकाही तिने तेवढ्य़ाच ताकदीने साकारल्या होत्या ...फॅशन, तनू वेड्स मनू आणि क्वीन....वादाला जागाच नव्हती. अभिनयापर्यंत सिमित न राहाता ती आता संवाद लेखन आणि दिग्दर्शनाच्या दिशेने पुढे चालली आहे..

एकेक शिखर पादाक्रांत करत असताना कंगना वादग्रस्तही ठरली...आदित्य पांचोलीसोबतच्या तिच्या लिव्ह इन रिलेशनशिपपासून ते थेट आत्ताच्या Nepotism पर्यंत. तिच्या इंग्रजी भाषेवर आणि फॅशन सेन्सवर सातत्याने होणारी टीका, अध्ययन सुमनशी तिची जवळीक, ऋतिक रोशनला आपला " silly ex “ संबोधल्यानंतर दुखावलेला ऋतिक रोशन ...त्यानंतर हा वाद थेट कोर्टापर्यंत गेला. तर दुसरीकडे करण जोहरला त्यांच्याच शोमध्ये जाऊन त्यालाच सुनावण्याचं धाडस कंगनाने केलं...Nepotism ला प्रोत्साहन देण्यावरुन कंगनाने करण जोहरला सुनावलं...बॉलिवूडमधून यावरुन वाद सुरु आहे. पण कंगनाला वादांची पर्वा नाही... जवळपास दोन करोडची फेअरनेस क्रीमची जाहिरात धुडकावणारी कंगनाच.

हा तिचा स्पष्टवक्तेपणा आणि खरेपणा म्हणता येईल जो तिच्या अभिनयातूनही वारंवार आपल्याला दिसतो. राणी झाशीसाठी तिला टेक्निकल गोष्टींसाठीच मेहनत घ्यावी लागेल. कणखर आणि लढवय्यी तर ती आहेच...