Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येतील राम मंदिरातील राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अखेर झाली आहे. संपूर्ण देशभरात 22 जानेवारीची प्रतिक्षा होती. यासाठी गेल्या महिन्याभरापासून जय्यत तयारी सुरु होती. त्यानुसार आज अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. दरम्यान फक्त अयोध्या नाही तर संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी केली जात आहेत. दुसरीकडे या सोहळ्याची चर्चा फक्त भारत नाही तर संपूर्ण देशभरात केली जात आहे.
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची पाकिस्तानी वृत्तपत्रांनीही दखल घेतली आहे. पाकिस्तानमधील वृत्तपत्रांनी लिहिलं आहे की, 'बाबरी मशीद पाडून उभारण्यात आलेल्या राम मंदिरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठा करणार आहेत'. पाकिस्तानमधील प्रमुख वृत्तपत्र 'द डॉन'ने एक ओपिनियन लेख प्रसिद्ध केला असून यामध्ये लेखक परवेज हुदभोय यांनी लिहिलं आहे की, येथे आधी पाच दशकं जुनी मशीद होती, आता तिथे राम मंदिर उभं राहिलं आहे.
अमेरिकेतील ब्रॉडकास्टर एनबीसी न्यूजने म्हटलं आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी हिंदू मंदिराचं उद्घाटन केलं जे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत धार्मिक तणावाचं कारण ठरलं होतं. अयोध्येतील हे मंदिर रामाचं आहे, जो प्रमुख हिंदू देवता आहे. हे मंदिर 30 लाखांची लोकसंख्या असणाऱ्या अयोध्येला पर्यटनस्थळ बनवण्यात महत्त्वाची भूमिका निभावणार आहे".
एबीसी न्यूजने म्हटलं आहे की, भाजपा अनेक दशकांपासून मंदिरासाठी आग्रह करत आहे. या मंदिराच्या उद्धाटनामुळे भारतात नरेंद्र मोदींना फायदा होईल. अर्धी लोकसंख्या हिंदू असणाऱ्या मॉरिशिअसमध्येही सरकारी कर्मचाऱ्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहण्यासाठी दोन तासांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
अमेरिकेतील एनजीओ हिंदूज फॉर ह्युमन राईट्सच्या कार्यकारी संचालक सुनिता विश्वनाथ यांच्या हवाल्याने अमेरिकन ब्रॉडकास्टरने लिहिलं आहे की, उद्घाटन सोहळा एक निवडणूक रणनीती असून, अशा गोष्टी टाळायला हव्यात. मोदी काही पुजारी नाहीत, यामुळे त्यांनी राजकीय फायद्यासाठी प्राणप्रतिष्ठा अनुष्ठान करणं अनैतिक आणि चुकीचं आहे.
युएईमधील वृत्तपत्र गल्फ न्यूजने आपल्या रिपोर्टला शीर्षक दिलं आहे की, 'नरेंद्र मोदींनी अयोध्येत हिंदू मंदिराचं उद्घाटन करणं भारतासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाने मागील अनेक दशकांपासून दिलेलं आश्वासन पूर्ण केलं आहे. नरेंद्र मोदींचा हिंदू राष्ट्रवाद मतदारांमधील त्यांच्या लोकप्रियतेच्या कारणांपैकी एक आहे. त्यांनी देशाला ज्या स्तरावर नेलं आहे त्यामुळे ते त्यांचे चाहते आहेत. देशाचा विकासदर 7 टक्क्यांहून अधिक आहे'.
लंडनस्थित वृत्तसंस्था रॉयटर्सने लिहिलं आहे की, पंतप्रधान मोदींनी राम मंदिराच्या उद्घाटनाला ऐतिहासिक क्षण संबोधत भारतीयांना सोमवारी त्यांच्या घरांमध्ये आणि जवळपासच्या मंदिरांमध्ये दिवे लावून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केलं आहे.
राजकीय समालोचक पृथ्वी दत्ता चंद्र शोभी यांचा हवाला देत रॉयटर्सने लिहिलं की, 'मंदिराचे उद्घाटन कोणत्याही धार्मिक उत्सवापेक्षा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात असल्यासारखे वाटते. मोठा धार्मिक विधी पार पाडणाऱ्या राजाच्या भूमिकेत पंतप्रधान असल्याचे दिसते.
रॉयटर्सने लिहिले की, राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याने भारतातही राजकीय वाद निर्माण केला आहे. कारण काँग्रेससह भारतातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण नाकारलं आहे. उद्घाटन सोहळा राजकीय, मोदींचा कार्यक्रम करण्यात आल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.
बीबीसी वर्ल्डने लिहिलं आहे की, हे मंदिर 16 व्या शतकात बांधलेल्या मशिदीची जागा घेईल जी 1992 मध्ये हिंदूंच्या जमावाने उद्ध्वस्त केली होती. मशीद पाडल्यानंतर देशभरात दंगली उसळल्या ज्यात सुमारे 2,000 लोक मारले गेले. मंदिराच्या उद्घाटनात भारतातील आघाडीचे अभिनेते, उद्योगपती आणि क्रिकेटपटू सहभागी होत असले तरी बहुतांश विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाचा वापर पंतप्रधान मोदी आपल्या राजकीय फायद्यासाठी करत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
बीबीसी वर्ल्डने पुढे लिहिले की, 'समीक्षकांनीही सरकारवर अशा देशात धार्मिक सण साजरा केल्याचा आरोप केला आहे, जो संविधानानुसार धर्मनिरपेक्ष आहे.'
नेपाळमधील आघाडीचं वृत्तपत्र 'द काठमांडू पोस्ट'ने आपल्या एका वृत्तात लिहिले आहे की, मंदिराच्या उद्घाटनात रामापेक्षा जास्त प्रसिद्धी मिळवणारी व्यक्ती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, जे भारताच्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीचे पंतप्रधान आहेत.
भारत धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वापासून खूप दूर गेला असून अयोध्येत भारताची धर्मनिरपेक्षता उद्ध्वस्त झाली आहे, असा आरोप या वृत्तपत्राने केला आहे.
कतारस्थित टीव्ही नेटवर्क अलजजीराने एका लेखात लिहिलं आहे की, 'भारताची धर्मनिरपेक्षता भगव्या राजकारणाखाली दबली गेली आहे.' भारतीय राजकीय भाष्यकार इन्सिया वाहनवती यांनी लिहिलेल्या लेखात असं म्हटलं आहे की, धर्मनिरपेक्ष भारताच्या पंतप्रधानांनी मंदिराचे उद्घाटन करणे अयोग्य आहे.
लेखात म्हटलं आहे की, 'बाबरी मंदिर पाडणे मुस्लिमांसाठी अजूनही वेदनादायक आहे. विध्वंसानंतर झालेल्या दंगलीत मृत्युमुखी पडलेल्यांची आजही आपल्यापैकी अनेकांना आठवण आहे. मशिदीची पुनर्बांधणी केली जाईल, अशी राजकीय आश्वासने देण्यात आली होती, परंतु तसे झाले नाही'.