Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारी रोजी संपन्न होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. भारतासह संपूर्ण जगभरात आज हा उत्साह पाहायला मिळतोय. हिंदू धर्माण प्रभू श्रीराम यांना खूप महत्त्व आहे. अयोध्येत श्रीरामांचा जन्म झाला. पण तुम्हाला माहितीये का भारताप्रमाणेच थायलंडमध्येही अयुध्या नावाचे एक ठिकाण आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयुथ्यातून माती पाठवण्यात आली होती. राम जन्मभूमी ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी चंपत राय यांनीही याला दुजोरा दिला होता. पण सवाल असा उपस्थित होतोय की थायलंड येथील अयुध्या आणि प्रभू श्रीरामाचा संबंध काय? आज आपण याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
तसं पाहायला गेलं तर थायलंड बौद्ध बहुल देश आहे. मात्र, तिथे हिंदू रिती-रिवाजाच्या खुणा दिसतात. येथील शाही परिवारातील अनेक परंपरा हिंदू धर्मानुसार मिळत्या जुळत्या आहेत. त्यामुळं या दोन देशातील सांस्कृतिक व धार्मिक संबंध काय हे जाणून घेऊया. दक्षिण आशिया देश थायलंडमध्ये जवळपास 95 टक्के लोकसंख्या बौद्ध आहे तर एक टक्क्याहून कमी हिंदू आहेत. असं असतानाही तिथे खूप सारे हिंदू मंदिर आहेत. यावरुनच प्राचीन काळात येथे हिंदू संस्कृती नांदत होती, असा दावा करण्यात येतो.
थाय लिपी आणि अन्य दक्षिण आशियातील लिपी या पुरातन तामिळ पल्लव लिपीतूनच आल्या आहेत, अशी मान्यता आहे. त्याचबरोबर इथल्या लोकांसाठी संस्कृत एक पवित्र भाषा आहे. तेथील नावही याचा आधारे असतात. येथील राजा-महाराजांच्या नाव राम 1, राम 2 असे असतात. 1782मध्ये येथे नावासोबत राम जोडण्याची परंपरा चालत आली आहे.
थायलंडमध्ये रामकिएन याला खूप महत्त्व आहे. याला थाई रामायणाचा दर्जा देण्यात आला आहे. थायलंडमधील साहित्य, कला, नाटकांवर रामकथेचा खूप प्रभाव आहे. थायलंडमधील अयुथ्या या शहराबद्दल बोलायचे झाल्यास या देशात 9व्या शतकात साम्राज्य स्थापित करण्यात आले. अयुत्थाया असं या शहराचे प्राचीन नाव असून ती थायलंडची प्राचीन राजधानी होती. मात्र, काळानुसार या शहराला अयुथ्या हे नाव पडले. थायलंडमधील अयुथ्या या शहराचे नाव अयोध्येच्या नावावरुन ठेवण्यात आले. येथील राजवंशातील प्रत्येक राजा इथे रामाचा अवतार मानला जातो.
अयुथ्या हे शहर वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केले आहे. इथे अनेक जुनी मंदिरे व ऐतिहासिक वास्तुंचे अवशेष आहेत. थायलंड, म्यानमार, कंबोडियातील वास्तुकलेचा वापर येथील अनेक वास्तुंमध्ये दिसतो. 1350 मध्ये रामथिबोडीने या शहराची स्थापना केली. चारशेपेक्षा जास्त वर्षे सियामी राजवटीची राजधानी म्हणून हे शहर प्रसिद्ध होते.