मुंबई : UKRAINE MBBS : भारतीय विद्यार्थी ( Indian Students) डॉक्टर (Doctor) होण्यासाठी युक्रेनला (Ukraine) पसंती देताना दिसत आहेत. भारतात वैद्यकीय शिक्षण मिळत असतानाही युक्रेनमध्ये का जातात भारतीय विद्यार्थी, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र त्या मागचेही कारणही तसेच आहेत. यातील प्रमुख कारण म्हणजे खर्च. भारतात डॉक्टर होण्यासाठी प्रचंड खर्च येतो. तर युक्रेनमध्ये राहूनही खर्च कमी येतो आणि युक्रेनमधून डॉक्टर झालेल्यांना जगात मान्यता मिळते.
युक्रेन-रशिया युद्ध सुरू झाले आणि युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची मायदेशी परतण्याची घालमेल सुरू झाली आणि युक्रेनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणाला जातात, हे अनेकांना पहिल्यांदाच पुढे आले आहे. युक्रेन आणि रशियामध्ये अनेक विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी अर्थात MBBS चं शिक्षण घेण्यासाठी जातात.
युक्रेनमध्ये या घडीला भारतातले जवळपास 20 हजार विद्यार्थी मेडिकल युनिव्हर्सिटीत शिकत आहेत. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण भारताच्या तुलनेने अतिशय स्वस्त आहे. भारतात खासगी महाविद्यालयांमध्ये डॉक्टर होण्यासाठी दरवर्षी जवळपास 15 ते 20 लाख खर्च येतो.
खासगी महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाचा पाच वर्षांचा खर्च तब्बल 90 लाख ते एक कोटीच्या घरात जातो. मात्र रशिया आणि युक्रेनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम, हॉस्टेल आणि खाण्यापिण्याचा खर्च मिळून 25 ते 30 लाख पाच वर्षांसाठी पुरेसे असतात.
युक्रेन, रशियामधल्या मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळवण्यासाठी एजंटला दोन ते तीन लाख द्यावे लागतात. भारतात एमबीबीएसच्या 88 हजार सीट्स आहेत. त्यासाठी 15 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी अर्ज करतात. त्यामुळे लाखो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. ज्यांची इच्छा असते ते वंचित राहतात.
भारतात मेडिकलसाठी अॅडमिशन न मिळणे आणि पुरेसा पैसा नसणे या मुख्य दोन कारणांमुळे अनेक विद्यार्थी डॉक्टर होण्याचे स्वप्न व्हाया युक्रेन किंवा रशिया पूर्ण करतात. अर्थात युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर भारतामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी परीक्षा द्यावी लागते.
एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी युक्रेनला जातात, हे समोर आल्यावर आता भारतातही स्वस्तात वैद्यकीय शिक्षण देता येईल का, याचा विचार होणार आहे, त्याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी तसे संकेत दिले आहेत.
ज्याच्याकडे लाखो रुपये आहेत, तोच आपल्या देशात डॉक्टर होऊ शकतो, हे सत्य आहे. आपल्या देशात स्वस्तात वैद्यकीय शिक्षण मिळू शकत नसेल, तर हा शिक्षणव्यवस्थेचा आणि राजकीय इच्छाशक्तीचा दोष आहे का? जे युक्रेनला शक्य आहे ते भारताला का नाही, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.