ऐन युद्धभूमीत भारताच्या तिरंग्याची शान, पाकिस्तानी विद्यार्थ्यांनीही घेतला तिरंग्याचा आसरा

भारतीय तिरंग्याने असा वाचवला पाकिस्तानी विद्यार्थ्यांचा जीव, भारतीय तिरंग्यामुळे या विद्यार्थ्यांना चेक पॉईंट सुरक्षितपणे पार करण्यास मदत

Updated: Mar 2, 2022, 03:25 PM IST
ऐन युद्धभूमीत भारताच्या तिरंग्याची शान,  पाकिस्तानी विद्यार्थ्यांनीही घेतला तिरंग्याचा आसरा title=

Russsia Ukraine War : रशियाने केलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये भीषण परिस्थिती आहे. तिथल्या नागरिकांचे जीव वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनमध्ये अडकेलल्या विद्यार्थ्यांना मायेदशी आणण्यासाठी भारत सरकारचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. रोमानिया, पोलंड आणि हंगेरीच्या सीमेवरुन भारतीय विद्यार्थ्यांना आणलं जात आहे. 

अशा कठीण काळात भारताच्या तिरंगामुळे तिथे अडकलेल्या भारतीय नागरिकांचे प्राण तर वाचलेच, पण पाकिस्तान आणि तुर्कस्तानचे नागरिकही आपले प्राण वाचवण्यात यशस्वी ठरले आहेत. भारतीय तिरंग्यामुळे या विद्यार्थ्यांना चेक पॉईंट सुरक्षितपणे पार करण्यास मदत झाली.

युद्धभूमीत भारताचा तिरंगा भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आला. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे कीव्हमधून हे विद्यार्थी मोल्डोवा या देशाच्या सीमेकडे निघाले होते. या विद्यार्थ्यांना भारताचा झेंडा बसवर लावण्याची सूचना करण्यात आली. त्यावर विद्यार्थ्यांनी तातडीने बाजारात धाव घेत तिरंग्याचे रंग मिळवले, भारताचे कापडी झेंडे रंगवण्यात आले. आणि ते बसच्या पुढे फडकवण्यात आले.

बस निघण्याआधी सर्व भारतीय विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत गात भारत मातेचा जयघोष केला. विशेष म्हणजे पाकिस्तानी विद्यार्थ्यांनीही भारताचा ध्वज हाती घेत पलायनाचा मार्ग निवडला. भारताच्या झेंड्यामुळे पाकिस्तानींचाही जीव वाचला. 

युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना घरी आणण्यासाठी भारत सरकार 'ऑपरेशन गंगा' राबवत आहे. अशा परिस्थितीत युक्रेनमधून रोमानिया शहरात पोहोचलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना विशेष विमानाने आणलं जात आहे. 

दक्षिण युक्रेनमधील ओडेसा इथल्या एका मेडिकलच्या विद्यार्थ्याने संपूर्ण कहाणी सांगितली. आम्हाला युक्रेनमध्ये सांगण्यात आलं होतं की  भारतीय ध्वज हातात घेतल्यास आम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. 'भारतीय ध्वज तयार करण्यासाठी त्यांनी बाजारातून स्प्रे पेंट कसा विकत घेतला हे विद्यार्थ्यांनी सांगितलं. एका विद्यार्थ्याने सांगितले, 'मी बाजाराकडे धाव घेतली, तीन रंगाचे स्प्रे घेतले आणि कपडाही घेतला. त्यानंतर स्प्रे पेंटच्या मदतीने भारताचा तिरंगा ध्वज बनवला.

पाकिस्तानी विद्यार्थ्यांना तिरंग्याचा आसरा
काही पाकिस्तानी आणि तुर्की विद्यार्थ्यांनीही भारतीय झेंडे घेऊन चेक पॉईंट ओलांडले. एका भारतीय विद्यार्थ्याने सांगितले की, अशा वेळी भारताच्या तिरंगामुळे पाकिस्तानी आणि तुर्की विद्यार्थ्यांचे प्राण वाचले. पाकिस्तान आणि तुर्कीचे विद्यार्थीही हातात भारताचा तिरंगा घेऊन प्रवास करत होते. ओडेसातील हे विद्यार्थी मोल्डोव्हाहून रोमानियाला पोहोचले.

एका विद्यार्थ्याने सांगितलं, 'आम्ही ओडेसा इथून बस बुक केली आणि मोल्डोव्हा सीमेवर पोहोचलो. मोल्डोव्हाचे नागरिक चांगले आहेत. त्यांनी आम्हाला मोफत राहण्याची सोय केली आणि आम्हाला रोमानियाला पोहोचता यावे म्हणून टॅक्सी आणि बसची व्यवस्था केली. भारतीय विद्यार्थ्यांनी सांगितले की, भारतीय दूतावासाने आधीच व्यवस्था केल्यामुळे त्यांना मोल्डोव्हामध्ये फारशी समस्या आली नाही.