जिनिव्हा : जगभरात थैमान घालणाऱ्या Coronavirus कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर बहुतांश राष्ट्रांनी सावधगिरीची पावलं उचलली. ज्यामध्ये Lockdown लॉकडाऊनच्या पर्यायाला अनेक राष्ट्रांनी प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं.
सध्याच्या घडीला जगभरात झपाट्याने फोफावणाऱ्या कोरोना व्हायरसचा वेग पाहता येत्या काळात ल़ॉकडाऊन शिथिल केल्यास कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या टप्प्याची लाट साऱ्या जगावर परिणाम करेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला. लॉकडाऊन हटवण्याची घाई नकोच असं म्हणत WHO आग्रही असल्याचं यातून स्पष्ट होत आहे.
वाचा : कोरोनाबाबतची देशातील या क्षणाची सर्वात मोठी बातमी
WHO चे आपात्कालीन विभाग प्रमुख Mike Ryan यांनी कोरोना आणि लॉकडाऊनबाबतीच ही माहिती दिल्याचं वृत्त 'बीबीसी'कडून प्रसिद्ध करण्यात आलं. सध्या आपण सर्वजण कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या पहिल्या टप्प्यात आहोत. या पहिल्या टप्प्याच्या अगदी मध्यावर आपण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. व्हायरसचा एकंदर प्रवास आणि रुग्णांची वाढती संख्या पाहता केव्हाही परिस्थिती बिघडू शकते असा दक्षतेचा इशारा WHO नं दिला आहे.
काही ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरीही येत्या काळातील परिस्थितीविषयी कोणताही अंदाज आपण वर्तवू शकत नसल्याचंही संघटनेकडून सांगण्यात आलं. परिणामी कोणत्याही प्रकारचे गर्दीचे कार्यक्रम थांबवण्यासाठी म्हणून राष्ट्रांनी लॉकडाऊन हटवण्यात कोणतीही घाई करु नये असा मोलाचा इशारावजा सल्ला देण्यात आला आहे.
लस सापडली नसल्यामुळे....
कोरोना व्हायरसवर अद्यापही प्रभावी लस सापडली नसल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतच या व्हायरसशी लढा दिला जात आहे. पण, लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर जेव्हा पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणांवर गर्दी होईल तेव्हा मात्र व्हायरसचा संसर्ग वाढू शकतो ही बाब नाकारता येणार नाही.
भविष्यातील धोका लक्षात घेता लॉ़कडाऊनचे नियम शिथिल करण्याऐवजी कोरोना संशयितांचा शोध घेऊन चाचण्यांची संख्या वाढवण्यावर भर देण्याचा सूर Mike Ryan यांनी आळवला.