Viral News: लग्न म्हणजे आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नापूर्वी आणि लग्नानंतर असणारं आयुष्य यामध्ये फार मोठा फरक असतो. दरम्यान, आपला जोडीदार कोण आणि कसा आहे यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे आपला जोडीदार निवडताना घाई न करणं उत्तम असतं. पण आपल्याला हवा तसाच जोडीदार मिळेल याची काही खात्री नसते. जेव्हा प्रयत्न करुनही अपेक्षित जोडीदार मिळत नाही, तेव्हा मॅट्रिमोनिअल साईट्स, विवाहसंस्था यांच्याकडे धाव घेतली जाते. पण एका तरुणीने चक्क सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत आपल्यासाठी जोडीदार शोधा असं आवाहन केलं आहे. इतकंच नाही तर आपल्याला जोडीदार शोधेल त्याला पैसे देण्याचं आश्वासनही दिलं आहे.
अमेरिकेतील या घटनेत तरुणीने आपल्यासाठी पती शोधणाऱ्याला 5000 डॉलर म्हणजेच 4 लाख 10 हजार 462 रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे. ईव टिली कॉल्सनने (Eve Tilley-Coulson) असं या तरुणीचं नाव आहे. ती मूळची लॉस एंजेलिसमधील (Los Angeles) आहे. 35 वर्षीय ईव कॉर्पोरेट वकील आहे. तिने टिकटॉकला (Tiktok) एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने आपल्याला एक चांगला पती हवा असून, तो शोधून देणाऱ्याला 4 लाख रुपये देऊ असं सांगितलं. तिच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच चर्चा रंगली आहे.
ईव टिली कॉल्सनचे टिकटॉकवर 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे तिने व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर काही वेळातच तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
I’m offering a $5,000 referral bonus to anyone who finds me a husband https://t.co/9T9Iifqh2d pic.twitter.com/yqIHsO1GJw
— New York Post (@nypost) July 12, 2023
"काही दिवसांपूर्वी मी माझ्या मित्रांना जर माझ्यासाठी नवरा शोधून दिला तर 5 हजार डॉलर्स देईन असं आश्वासन दिलं होतं. पण नंतर मी विचार केला की, ही ऑफर टिकटॉकवर का देऊ नये?," असं ईवने व्हिडीओत म्हटलं आहे. यानंतर जून महिन्यात ईवने टिकटॉकला पती शोधून देण्याचं आवाहन करणारा व्हिडीओ शेअर केला. 'जर तुम्ही मला माझा जोडीदार मिळवून दिलात, तर मी तुम्हाला 5 हजार डॉलर्स देईन,' असं तिने सांगितले.
दरम्यान ईवने यासह एक आश्चर्यकार गोष्टही सांगितली आहे. आपल्याला फार काळ जोडीदारासह राहण्याची इच्छा नाही, कदाचित 20 वर्षांनी मी त्याला घटस्फोट देईन असंही तिने स्पष्ट केलं आहे.
ईवने सांगितलं आहे की, गेल्या पाच वर्षांपासून मी एकटी आहे. मी डेटिंग अॅप्सवर अनेकांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण कोणी आवडलं नाही. करोनानंतर डेट करण्याची पद्धत अजब झाली आहे. लोक तुम्हाला भेटत नाहीत, ना डेटिंग अॅपवर गांभीर्याने घेतात.
34 वर्षीय ईवने जोडीदारासंबंधी काही अटीही सांगितल्या आहेत. आपला भावी पती 27 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावा आणि किमान 6 फूट उंच असावा. याशिवाय, तो विनोदी आणि हुशार असावा. खेळात चांगला असावा. तसंच बोलण्यात चांगला असावा. त्याला कोणत्याही प्रकारचं व्यसन नसावं अशा तिच्या अटी आहेत.