Trump Musk Interview: आपण राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेच्या इतिहासामधील सर्वात मोठी डिपोर्टेशन मोहिम राबवणार असल्याचं अमरेकेचे माजी राष्ट्रध्यक्ष आणि 2024 च्या राष्ट्रध्यक्ष स्पर्धेत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एक्सचे (आधीचं ट्वीटर) मालक एलॉन मस्क यांना एक्सवरुन दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी स्थानिकांना नोकऱ्यांसदर्भात सकारात्मक भूमिका मांडली असल्याने भारतामधून अमेरिकेत नोकरीच्या शोधात जाणाऱ्यांच्या अडचणी भविष्यात वाढू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या अमेरिकेच्या विस्थापितांसंदर्भातील धोरणांची जोरदार चर्चा असतानाच विस्थापितांचा मुद्दा हा आपल्या प्रचाराच्या केंद्रस्थानी असेल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांनी आपल्या योजनेंसंदर्भात मस्क यांना सांगताना, कागदोपत्री पूर्तता न करणाऱ्या लाखो विस्थापितांना देशातून बाहेर हाकलण्याची कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. "अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठं डिपोर्टेशन येत्या काळात पाहायला मिळेल," असं ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. "विस्तापितांसंदर्भातील आपली धोरणं पूर्णपणे लागू होतील आणि कायदेशीर माध्यमातून लोक देशात येतील याची काळजी घेतली जाईल," असं ट्रम्प यांनी सांगितलं.
देशामध्ये बेकायदेशीरपणे मोठ्याप्रमाणात घुसखोरी होत असल्याने आपण ही डिपोर्टेशन मोहीम हाती घेत आहोत, असं ट्रम्प म्हणाले. देशाच्या सुरक्षेसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी इतर देशांमधून आलेल्यासंदर्भातील धोरणं अधिक कठोर करण्याची गरज असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. "आपल्या देशातील नागरिक आणि देशाची सीमा संरक्षित करण्यासाठी आपण ठोस निर्णय घेतले पाहिजे," असं ट्रम्प म्हणाले. सध्या अमेरिकेमध्ये विस्थापितांमुळे वाढत असलेल्या समस्यांवर उपाय म्हणून डिपोर्टेशन राबवणे आणि अमेरिकेत येण्याचे नियम कठोर करणे हे दोन महत्त्वाचे मार्ग असल्याचं म्हटलं आहे.
बेकायदेशीरपणे अमेरिकेमध्ये येणाऱ्या विस्थापितांना ट्रम्प यांनी 'कट्टरतावादी' तसेच 'लपलेले दहशतवादी' असं म्हटलं आहे. या सर्वांना आपण देशातून बाहेर काढून असं आश्वासनही ट्रम्प यांनी दिलं आहे. 5 नोव्हेंबर 2024 नंतर या अशा लोकांची आकडेवारी तपासून त्यापैकी बेकायदेशीर लोकांना देशाबाहेर काढलं जाईल असं ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प यांनी अमेरिकेमधील वाढणारी बेरोजगारी कमी करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं सांगितलं. जास्तीत जास्त कंपन्यांनी अमेरिकेमध्ये यावं यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं ट्रम्प म्हणाले. "लोकांनी त्यांना आवडणारी कामं करावीत, जे आवडेल त्यामध्ये त्यांना नोकरी मिळावी असं मला वाटतं," असं ट्रम्प यांनी सांगितलं.
अमेरिकेमध्ये नोकरी आणि शिक्षणासाठी स्थायिक झालेल्या भारतीयांची संख्या तब्बल 50 लाखांच्या आसपास आहे. अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपैकी 1.35 टक्के नागरिक हे भारतीय आहेत. दक्षिण आशियाई देशांचा विचार केल्यास सर्वात मोठ्या संख्येनं अमेरिकेत स्थायिक झालेल्या नागरिकांमध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो. परदेशी नागरिकांसंदर्भातील नियम ट्रम्प यांची सत्ता आल्यानंतर कठोर करण्यात आले तर या 50 लाख भारतीयांना याचा फटका बसू शकतो. ट्रम्प यांच्या बोलण्याचा विचार केल्यास ते सर्व परदेशी नागरिकांच्या कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन करणं, नियम अधिक कठोर करणं यासारखे निर्णय घेण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे समजते.