Trending News : लग्नाआधी एक तरुणी आपल्या आधीच्या पाच बॉयफ्रेंडला (EX Boyfriend) भेटायला गेली. वाचायला हे विचित्र वाटत असलं तरी यामागे कारण मात्र विचार करायला लावणारं आहे. या तरुणीचं लग्न ठरलं पण लग्नाआधी तीने आपल्या पाच बॉयफ्रेंडचा पत्ता शोधत त्यांची भेट घेतली. लग्न टिकवण्यासाठी या तरुणीने हा विचित्र प्रयोग केला. लग्नानंतर पतीबरोबरच नातं तुटू नये, यासाठी आपल्यात काय कमी आहे याचा शोध घेण्याचं तीने ठरवलं. यासाठी तीने आधीच्या पाचही बॉयफ्रेंडची भेट घेत त्यांचं आपल्याविषयीचं मत जाणून घेतलं.
बॉयफ्रेंडच्या प्रतिक्रिया
33 वर्षांच्या या तरुणीचं नावं एमी असं आहे, आधी केलेल्या चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी तीने आपल्या बॉयफ्रेंडची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी एक एक करुन तीने आपल्या पाच एक्स बॉयफ्रेंडची भेट घेतली. 16 व्या वर्षी तीचं बेन या तरुणाशी पहिलं प्रेम झालं, पण काही महिन्यातच तीचं ब्रेकअप झालं. तीने आपल्या पहिल्या बॉयफ्रेंडला याचं कारण विचारलं. ब्रेक अप होण्याचं कारण तीच होती असं उत्तर पहिल्या बॉयफ्रेंडने दिलं. 8 महिन्यांच्या संबंधांमध्ये तीने कधीच आपल्या बॉयफ्रेंडवर विश्वास ठेवला नाही. त्यामुळेच तिचा पहिला ब्रेकअप झाला.
बेननंतर एमीच्या आयुष्यात सॅमची एन्ट्री झाली. युनिव्हर्सिटीत या दोघांचं एकमेकांवर प्रेम जुळलं. हे नातं दोन वर्ष टिकलं. पण एमीने हे प्रेम प्रकरण फारसं गांभीर्याने घेतलं नाही. काही तरी नविन करण्यासाठी तीने सॅमशी ब्रेकअप केलं. सॅमनंतर एमी आणखी एका व्यक्तीच्या प्रेमात पडली. त्याच्यापासून तिला एक मुलही झालं. पण त्या व्यक्तीने तिच्याशी लग्न करण्यास असमर्थता दर्शवली आणि हे नातंही तुटलं. त्यानंतर एमीने काही महिने एका संगितकाराला डेट केलं पण त्यांची मनं जुळली नाहीत.
यानंतर एमीच्या आयुष्यात डेव्हिड नावाचा तरुण आला. डेव्हिडबरोबर आपलं नातं फारकाळ टिकेल असं वाटत असतानाच एमी आणि डेव्हिडमध्ये पैशांवरुन भांडणं सुरु झाली आणि यावरुनच त्यांच्यात बिनसलं. आता एमीचं जोनाथनबरोबर लग्न होणार आहे. लग्नाआधी या सर्व कारणांचा एमीने शोध घेतला. त्या चुका पुन्हा होऊ नयेत आणि जोनाथनबरोबरच लग्न कायमचं टिकावं या मागचा उद्देश होता. एमीने केलेल्या या प्रयोगाची सध्या चांगलीच चर्चा आहे.