पाकिस्तानातही तबलिगी जमातवर लोक संतप्त; १० हजार जण क्वारंटाईन

तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला ७० ते ८० हजार लोक जमले होते. 

Updated: Apr 9, 2020, 09:59 AM IST
पाकिस्तानातही तबलिगी जमातवर लोक संतप्त; १० हजार जण क्वारंटाईन title=

लाहोर: दिल्लीच्या निझामुद्दीन परिसरातील मरकजमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमावरून सध्या भारतात 'तबलिगी जमात'ला मोठ्याप्रमाणावर लक्ष्य करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला आलेल्या लोकांमुळे देशाच्या विविध भागांमध्ये कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला. त्यामुळे तबलिगी जमातवर अनेकजण तुटून पडले आहेत. 

मात्र, हा रोष केवळ भारतापुरताच मर्यादित नसल्याची माहिती आता पुढे येत आहे. जगावर कोरोनाचे संकट घोंघावत असतानाही तबलिगी जमातने पाकिस्तान आणि मलेशियात धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये तबलिगी जमातवर सडकून टीका होत आहे.

तबलिगी जमातवरून गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मोदी सरकारला आठ सवाल

यापैकी पाकिस्तानच्या रायविंद शहरात आयोजित करण्यात आलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला ७० ते ८० हजार लोक जमले होते. यामध्ये  ४० देशांतील तब्बल ३००० परदेशी नागरिकांचा समावेश होता. त्यामुळे पाकिस्तानात कोरोनाचा मोठ्याप्रमाणावर प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्यांपैकी ५३९ जण आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 

'तबलिगी जमातचा कार्यक्रम झाला नसता तर देशातील परिस्थिती वेगळी असती'

त्यामुळे पाकिस्तानमधील सरकारी यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या असून त्यांनी देशभरातील तबलिगींचा माग काढण्यास सुरुवात केली आहे. पंजाब प्रांतातील ३६ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत १०,२६३ तबलिगींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर हा कार्यक्रम पार पडलेले रायविंद शहरही पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे. याठिकाणी कोरोनाचे जवळपास ४०४ रुग्ण सापडले आहेत. 

दरम्यान, लॉकडाऊनमुळे अजूनही रायविंदच्या मरकजमध्ये ५००० तबलिगी अडकून पडले आहेत. यामध्ये ३००० परदेशी नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत ४१९६ लोकांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ६० जणांचा मृत्यू झाला आहे.