Russia - Ukraine War : युक्रेनमधील एका सैनिकावर (Ukranian Soldier) डॉक्टरांनी काही दिवसांपूर्वीच एक शस्त्रक्रिया केली. खरं तर या सैनिकाची अवस्था पाहता तो जिवंत राहणार की नाही अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र या शस्त्रक्रियेत डॉक्टरांना यश आलं या जवानाचे प्राण वाचले. (Surgeon Removes live grenade from inside soldiers body) युक्रेनची राजधानी असलेल्या कीव शहरातील लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका जवानाच्या छातीमधून जिवंत ग्रेनेड यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आला. डॉक्टरांनी या जखमी जवानाच्या हृदयाच्या खालच्या भागातून जिवंत ग्रेनेड शस्त्रक्रीयेनंतर बाहेर काढला.
युक्रेनचे उप-संरक्षण मंत्री हन्ना मालियार यांनी सोशल नेटवर्किंगवरुन या जखमी जवानाच्या एक्स-रेचा फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. "लष्कराच्या डॉक्टरांनी एक व्हिओजी ग्रेनेड (live grenade) शरीरातून काढण्यासाठी या जवानावर शस्त्रक्रिया केली. हा ग्रेनेड जवानाच्या शरीरात घुसला होता मात्र फुटला नव्हता," अशी कॅप्शन मालियार यांनी या एक्स-रेच्या फोटोला दिली आहे.
मालियार यांनी ही शस्त्रक्रिया अप्रत्यक्षपणे डॉक्टरांच्या जीवासाठीही धोकादायक असल्याचं सूचित केलं आहे. "ही शस्त्रक्रिया करताना इलेक्ट्रोकोएग्यूलेशनचा (शस्त्रक्रिया करताना रक्तस्त्राव नियंत्रित करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत) वापर न करता करण्यात आली. यामागील मुख्य कारण म्हणजे जवानाच्या शरीरामधील हा ग्रेनेड कधीही फुटला असता," असंही मालियार म्हणाले.
देशाचे संरक्षणमंत्री अॅटोन गेराशचेंको यांनी गुरुवारी एक टेलिग्राम अपडेटमध्ये या शस्त्रक्रियेबद्दलची माहिती दिली. "ग्रेनेडचा न फुटलेला तुकडा हृदयाच्या खालच्या भागातून काढण्यात आला," असं गेराशचेंको म्हणाले. त्यांनी युक्रेन लष्कराच्या आरोग्य विभागातील कमांडर नियंत्रण सल्लागार येवगेनिया स्लिवको यांच्या हवाल्याने थोडक्यात बचावलेल्या या सैनिकाचं वय 28 वर्ष असल्याचं सांगितलं आहे.
गेराशचेंको यांनी, "आमच्या डॉक्टरांनी अशाप्रकारची शस्त्रक्रीया कधीच झालेली नाही. अफगाणिस्तान युद्धाच्या वेळेस असं झालं होतं. सध्याच्या जखमी सैनिकाबद्दल मी इतकं सांगू शकतो की तो 1994 साली जन्माला आला आहे. त्याला आता उपाचारानंतर मेडिकल कॅम्पमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. मला वाटतं की या सारख्या प्रकरणाचा मेडिकलच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश केला जाईल," असंही म्हटलं.