कोलंबो : प्राणी आणि मानवाचे नाते ऐतिहासिक आहे. हजारो वर्षांपासून मानव प्राण्यांचे पालन करीत आहे. पाळीव प्राणी आणि मानवामध्ये एक भावनिक नाते देखील तयार होत असते. असंच काहीसं श्रीलंकेत पाहायला मिळाले आहे. हत्तीच्या निधनामुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. हा हत्ती देशातील सर्वात पवित्र हत्ती मानला जात होता. निधनानंतर या हत्तीचे शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.
द इंडिपेंडंट मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या पवित्र हत्तीचे नाव 'नाडुंगमुवा राजा' असे होते. त्याचे वय 68 वर्षे इतके होते. कोलंबोत या हत्तीचा मृत्यू झाला. बौद्ध धर्मियांच्या धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनात या हत्तीची भूमिका महत्वाची असे.
नाडुंगमुवा राजा या हत्तीचा जन्म भारतात 1953 साली झाला होता. तेव्हाच्या म्हैसूरच्या राजाकडून श्रीलंकेच्या बौद्ध भिक्षुला भेट म्हणून देण्यात आला होता. हत्तीने कॅंडी शहरात दरवर्षी 'एसाला पेराहेरा पेजेंट' सोहळ्यामध्ये भगवान बुद्धांच्या पवित्र गोष्टी आपल्या पाठीवरून मिरवत असे. देशाविदेशातील भक्तांसाठी हा हत्ती आकर्षणाचे केंद्र ठरत असे.