Santosh Deshmukh Murder Case : बीड मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात सर्वात मोठा अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुऱ हत्येपूर्वीचा सीसीटीव्ही झी 24 तासच्या हाती लागलाय. या सीसीटीव्हीमध्ये सर्व आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे एकत्र दिसत आहे. खात्रीदायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 29 नोव्हेंबर 2024 ला विष्णू चाटे याच्या कार्यालयात बैठक झाली होती. त्याच दिवशी खंडणी मागण्यात आली होती. ही बैठक केजमध्ये झाली होती. याच दिवशी आवादा कंपनीकडे खंडणी मागण्यात आली होती. सीसीटीव्हीमध्ये विष्णू चाटे, वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, बालाजी तांदळे, प्रतीक घुले हे सर्वच आरोपी दिसत आहेत. निलंबित पोलीस अधिकारी पाटीलही या सीसीटीव्हीत दिसतोय.
विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्याप्रकरणात संशयास्पद भूमिका असलेले आणि निलंबित पीएसआय राजेश पाटील हेदेखील या फूटेजमध्ये दिसल्याने सर्वांच्या भुवया उंचवल्यात. यात पाटील वाल्मिक कराडला भेटल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याने हा सर्वात मोठा पुरावा मानला जातोय.
राजेश पाटील यांचा विष्णू चाटे याला हॉटेलमध्ये भेटतानाचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यानंतर आता दुसऱ्या व्हिडीओमध्येही संतोष देशमुख हत्याप्रकरणात सहभागी असलेल्या वाल्मिक कराडच्या गँगसोबत राजेश पाटील दिसून आल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात हा मोठा पुरावा मानला जातोय. यापूर्वी केज शहरातील बसंत बिहार या उडपी हॉटेल मधला सीसीटिव्ही व्हिडिओ समोर आलं होतं. ज्यात पीएसआय राजेश पाटील, आरोपी सुदर्शन घुले आणि मयत संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हा देखील त्या दोघांसोबत चर्चा करत आहे.
सरपंच देशमुख यांची हत्या अतिशय निर्घृणपणे अमानवीय पद्धतीने करण्यात आली होती. 6 डिसेंबर 2024 ला झालेल्या आवादा कंपनीच्या स्टोर यार्डवरील हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला सुरुवात झाली. यानंतर 9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. टोल नाक्यावरून देशमुख यांचे अपहरण करण्यात आले, त्यानंतर त्यांना जबर मारहाण देखील करण्यात आली होती. ही मारहाण इतकी भयानक होती की त्यांच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या. मात्र आता या प्रकरणाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.
देशमुख यांची हत्या करण्याआधी एक दिवस आरोपींनी बीड अंबाजोगाई महामार्गावरील तिरंगा हॉटेलवर जेवण केल्याचं समोर आले आहे. त्यामुळे याच हॉटेलवर देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याच उघड होत आहे.