पीठ घेण्यासाठी शेकडो लोक जमले अन् कंपनीचे गेट बंद झाले... चेंगराचेंगरीत 11 लोकांचा गेला जीव

Pakistan Stampede : शुक्रवारी दक्षिण पाकिस्तानातील कराची शहरामध्ये अन्नधान्याच्या वितरणादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत अकरा लोकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या आर्थिक संकटामुळे अशा अनेक घटना सातत्याने घडत असल्याचे समोर येत आहे.

Updated: Apr 1, 2023, 01:43 PM IST
पीठ घेण्यासाठी शेकडो लोक जमले अन् कंपनीचे गेट बंद झाले... चेंगराचेंगरीत 11 लोकांचा गेला जीव title=
(फोटो सौजन्य - AP)

Pakistan Karachi Stampede : आपल्या शेजारील देश पाकिस्तान (Pakistan) सध्या राजकीय सत्तासंघर्षासोबत अनेक गोष्टींना तोंड देत आहे. वाढत्या महागाईसोबत (inflation) अन्न धान्याच्या टंचाईमुळे पाकिस्तानातील जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. अन्नधान्य मिळवण्यासाठी लोक रस्त्यांवर भटकत आहेत. त्यातच रमजानचा (ramzan) महिना असल्यामुळे मुस्लिम बहुल असलेल्या पाकिस्तानात या नव्या संकटामुळे आता लोकांना आपला जीव गमावावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी पंजाब (Punjab) आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात मोफत मिळणाऱ्या पिठासाठी (flour) झालेल्या चेंगराचेंगरीत (Stampede) पाच जणांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा डझनभर लोकांना मोफत पीठ मिळवण्याच्या नादात जीव गमवावा लागला आहे.

पाकिस्तानच्या कराची शहरात शुक्रवारी मोफत पीठ वितरणाच्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत महिला आणि मुलांसह किमान 11 लोक ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले आहेत. कराचीतल्या एका कारखान्यात रमजानच्या निमित्ताने कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना पीठ व इतर खाद्यपदार्थ मिळणार होते. मात्र कार्यक्रमादरम्यान मोठ्या संख्येने लोक तेथे पोहोचले. त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

अन्न धान्याच्या अडचणीमुळे पाकिस्तान सरकारने मोफत रेशन वितरण मोहीम सुरू केली आहे. अनेक ठिकाणी चेंगराचेंगरीमुळे अशा घटना घडल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी कराचीत झालेल्या या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. शुक्रवारी कराचीमधील औद्योगिक क्षेत्र सिंध इंडस्ट्रियल अँड ट्रेडिंग इस्टेटमध्ये (SITE) हा सर्व धक्कादायक प्रकार घडला. औद्योगिक वसाहतीमधील 'एफके डाईंग' ही खासगी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना रमजानच्या निमित्ताने पीठ आणि इतर खाद्यपदार्थ देणार होती. मात्र यावेळी मोठी गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी झाली.

या चेंगराचेंगरीमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये महिला आणि बालकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. कराची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 11 मृतांची ओखळ पटली आहे. यामध्ये आठ महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. तर इतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. "एफके डाईंग कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना या वस्तू घेण्यासाठी बोलावले होते. मात्र कंपनीने कारखान्यात जेवढ्या लोकांना बोलवले त्याच्यापेक्षा जास्त लोक तिथे जमा झाले होते. त्यात बहुतांश महिला होत्या," असे फिदा हुसेन म्हणाल्या.

या वस्तू मिळणार असल्याची माहिती इतर लोकांनाही मिळाली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. मात्र गर्दीला आवरण्यासाठी कोणतीही व्यवस्था तिथे नव्हती. त्यामुळे कंपनीतल्या कर्मचाऱ्यांनी गेट बंद करुन टाकले. त्यामुळे कारखान्यात लोक गुदमरु लागले. अनेक महिला बेशुद्ध पडल्या. त्यानंतर लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि त्यातच अनेकांचा जीव गेला. हा सर्व प्रकार झाला तेव्हा कंपनीचा मालकही तिथे नव्हता. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून सिंध प्रांताचे मंत्री सईद गनी यांनी याप्रकरणात सात जणांना अटक केल्याची माहिती दिली आहे.