Migrant : बेकायदेशीरपणे अमेरिकेत (US) प्रवेश करण्याच्या प्रयत्नात कॅनडा-अमेरिकेच्या सीमेजवळ असलेल्या नदीच्या काठावर आठ जण मृतावस्थेत सापडले आहेत. अवैधरित्या अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आठ जणांचे मृतदेह कॅनडा पोलिसांनी (Canada Police) नदीतून बाहेर काढले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये एका भारतीय कुटुंबाचाही (Indian family) समावेश आहे. कॅनडा पोलिसांनी दोन मुलांसह आठ जणांचे मृतदेह नदीबाहेर काढल्याने खळबळ उडाली आहे. कॅनडातून बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करताना या सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये एका भारतीय कुटुंबातील पाच सदस्यांचाही समावेश आहे. हे सर्व जण सेंट लॉरेन्स नदी ओलांडून कॅनडातून अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते, अशी माहिती रॉयटर्सने दिली.
बुडालेल्या बोटीजवळ सर्वांचे मृतदेह सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मृतांमध्ये दोन कुटुंबे होती अशीही माहिती समोर आली आहे. यामध्ये एक कुटुंब भारतीय असून दुसरे कुटुंब मूळचे रोमानियाचे असून त्यांच्याजवळ कॅनडाचा पासपोर्ट आढळला आहे. दुसरीकडे, कॅनडाच्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
"एकूण आठ मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. यामध्ये दोन लहान मुलासह सहा जणांचा समावेश आहे. गुरुवारी संध्याकाळी सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर ज्या दोन व्यक्तींचे मृतदेह नंतर सापडले त्यात रोमानियन वंशाचा मुलगा आणि एका भारतीय महिलेचा समावेश होता," असे स्थानिक पोलीस अधिकारी शॉन दुलुडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हे सर्व कॅनडातून बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते, अशी माहितीही पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. मृतांमध्ये सापडलेल्या तीन वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलाकडे कॅनडाचा पासपोर्ट आढळून आला आहे.
मोहॉक हा आदिवासी प्रदेश एकीककडे क्यूबेक आणि ओंटारियो या कॅनडाच्या तर दुसरीकडे अमेरिकेच्या न्यू यॉर्कमध्ये पसरलेला आहे. पाऊस, गारपीट आणि जोरदार वारा यासह खराब हवामानामुळे बोट उलटली असावी. त्यामुळे बोटीवरील लोकांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची वाट पाहिली जात आहे.
गेल्या काही काळापासून कॅनडातून बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करण्याचे अनेकदा प्रयत्न होताना दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वी कॅनडा - अमेरिकेच्या सीमेजवळ दोन जण मृतावस्थेत सापडले होते. गेल्या आठवड्यात राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या ओटावा भेटीदरम्यान, या समस्येच्या व्यवस्थापनावर कॅनडाच्या राष्ट्राध्यक्षांशी करार झाला होता. बेकायदेशीररीत्या कॅनडात प्रवेश करणाऱ्या लोकांना अमेरिका आश्रय देईल यावर एकमत झाले होते. तर दुसरीकडे , पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी या घटनेबाबत पत्रकारांशी बोलताना, "आमच्या भावना मृतांच्या कुटुंबियांसोबत आहेत. ही खरचं हृदयद्रावक परिस्थिती आहे," असे म्हटले आहे.