Russia Sarmat Nuclear Missile: युक्रेनविरुद्ध सुरु असलेल्या युद्धादरम्यान रशियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. जगातील सर्वात धोकादायक अस्रांपैकी एक असलेलं सॅरमॅट नावाचं आण्विक क्षेपणास्त्र रशियाने सज्ज ठेवलं आहे. हे एक आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे. रशियाच्या या निर्णयामुळे युरोपातील अनेक छोटे मोठे देशांची खास करुन नाटोच्या सदस्य देशांची चिंता वाढली आहे. रशियन अंतराळ संस्थेचे प्रमुख यूरी बोरिसोव यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. "सॅरमॅट क्षेपणास्राला सेवेत दाखल करुन घेण्यात आलं आहे," असं बोरिसोव म्हणाले. युक्रेन युद्धानंतर नाटो देश आणि रशियामध्ये सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या महायुद्धाची चर्चा जगभरात सुरु असतानाच आता रशियाच्या या निर्णयाने या चर्चेला पुन्हा हवा दिली आहे.
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी याचवर्षी फेब्रवारी महिन्यामध्ये या अण्वस्त्रासंदर्भात बोलताना, "या क्षेपणास्त्रामुळे रशियाच्या शत्रुला कोणतंही पाऊल उचलण्याआधी दोनदा विचार करावा लागेल," असं म्हटलं होतं. 2022 साली फेब्रुवारी महिन्यामध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर सध्या रशिया युद्धामध्ये थोडी बचावात्मक भूमिका घेत असल्याचं दिसत आहे रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी टीव्हीवरुन देशवासियांना आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी सज्ज राहा असा संदेश दिला आहे.
रशियाचे आर-एस 28 सॅरमॅट हे एसआय 10 वर आधारित क्षेपणास्त्र आहे. एकाच वेळी हे क्षेपणास्त्र 15 अण्विक स्पोटके वाहून नेऊ शकतं इतकी त्याची क्षमता आहे. 'नाटो' देशांची संघटना या क्षेपणास्त्राचा उल्लेख सॅटन 2 नावाने करते. सॅरमॅटची मारक क्षमता ही अगदी अमेरिकेपर्यंत आहे. ताश या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, 'आर-एस 28 सॅरमॅट क्षेपणास्त्र एकाच वेळी 10 टन वजनाचे 15 अणुबॉम्ब वाहून नेण्यास सक्षम आहे.' जगातील कोणत्याही कोपऱ्यात या क्षेपणास्त्राच्या मदतीने हल्ला करता येईल इतकी याची क्षमता आहे. दरम्यान, वॉशिंग्टनने शुक्रवारी जारी केलेल्या एका पत्रकामध्ये, "रशियाने सॅरमॅट क्षेपणास्त्र तयार ठेवलं आहे हे खात्रीशीरपणे सांगू शकत नाही," असं म्हटलं आहे.
फेब्रुवारी महिन्यामध्येच एका भाषणादरम्यान पुतिन यांनी सॅरमॅटला लवकरात लवकर तैनात केलं जाईल असं म्हटलं होतं. सॅरमॅटमुळे रशियाला परदेशी धोक्यांपासून सुरक्षित ठेवता येईल असं ते म्हणाले होते. रशियाने दिलेल्या माहितीनुसार, सॅरमॅट एकावेळेस 15 अणुबॉम्ब घेऊन जाऊ शकतं. तर अमेरिकेने केलेल्या दाव्यानुसार सॅरमॅटची क्षमता एकावेळेस 10 अणुबॉम्ब वाहून नेण्याची आहे.
सॅरमॅटचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या क्षेपणास्त्राची लॉन्चिंग फेज फारच कमी आहे. त्यामुळे इतर देशांना हे क्षेपणास्त्र ट्रॅक करता येत नाही. 200 टन वजनाचं हे क्षेपणास्त्र 18 हजार किलोमीटर दूरपर्यंत शत्रुचा वेध घेण्यास सक्षम आहे.