मुंबई : संगीताचा आणि झाडांचा काय संबंध? असा प्रश्न तुम्हाला पडेल. पण झाडांनी गाणं ऐकल्यावर त्यांच्यावर परिणाम होतो अशी माहिती एका रिसर्चमध्ये समोर आली आहे. संशोधनात असं सांगण्यात आलं आहे की, म्युझिकमुळे झाडांची वाढ अधिक वेगाने होते.
त्याचप्रमाणे असे देखील सांगण्यात आले आहे की, जर कुणी व्यक्ती झाडांना स्वतः गाण गाऊन ऐकवत असेल तर त्या झाडांची वाढ झपाट्याने होते. यामुळे झाडांना जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साइड मिळते. झाडाचे म्युझिकसोबत असलेलं हे नातं अतिशय खास आहे. जाणून घ्या त्याबद्दलच्या खास गोष्टी
अन्नामलाई विश्वविद्यालयातील वनस्पती विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. टी सी सिंह यांनी सांगितले की, बी पेरल्यानंतर जर त्यांना गाणं ऐकवण्यात आलं तर त्यांच्यात झपाट्याने वाढ झाली. एवढंच नाही तर इतर रोपट्यापेक्षा या रोपट्यांमध्ये अधिक पानं असल्याचे देखील निदर्शनास आले. तसेच या पानांचा आकार देखील इतर पानांपेक्षा मोठा आणि जाड असतो. त्यामुळे यातून हाच निष्कर्ष समोर आला आहे की, झाडांच्या वाढीसाठी गाण्याची मोठी मदत होते. सिंह यांच्या म्हणण्यानुसार गाण्यामुळे त्यांच्या आनुवंशिक गुणसूत्रांमध्ये देखील बदल होतो.
कॅनडातील एका इंजिनिअरने गहूच्या रोपट्यांवर एक प्रयोग केला. त्याने या रोपट्यांना दररोज न चुकता वायलिन वाजवून दाखवलं. त्याचा रिझल्ट असा समोर आला की, दुसऱ्या रोपट्यांच्या तुलनेत त्याची वाढ चांगली झाली. ज्या रोपट्यांना संगीत ऐकवलं त्यांच्यामध्ये ६६% अधिक वाढ झाल्याचे लक्षात आले.
१९७३ मध्ये फ्रान्सिस ब्राऊन या प्रोफेसरने एक अनोखा प्रयोग केला. यामध्ये त्यांनी रोपट्यांचे ३ समूह करून वेगवेगळ्या प्रकारचे संगीत ऐकवले. यामध्ये त्यांनी पहिल्या समूहाला ८ तास संगीत ऐकवले तर दुसऱ्या समुहाला तीन तास गाणं ऐकवलं तर तिसऱ्या समुहाला अजिबातच संगीत ऐकवले नाही.
पहिल्या समुहातील रोपटी अवघ्या दोन आठवड्यात मरून गेली. तर दुसऱ्या समुहातील झाडे ही अतिशय हेल्दी असल्याचं समोर आलं. कारण त्याला योग्य प्रमाणात संगीत मिळाल्याचे स्पष्ट झालं. आणि तिसऱ्या समुहाची वाढ ही नॉर्मल झाली. यामुळे हे सिद्ध झाले की झाडांना म्युझिक ऐकवणं अतिशय महत्वाचं आहे. यासोबतच झाडांना अतिशय शांत आणि मधुर संगीत पसंद आहे.