इस्लामाबाद : चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी 'डॉलर'ला चलनातून हद्दपार करत अमेरिकेला जोरदार झटका दिलाय.
पाकिस्तानचे योजना, विकास तसंच आंतरिक मंत्री एहसान इक्बाल यांनी 'चीन - पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर' अंतर्गत व्यवहारातून अमेरिकन डॉलरऐवजी चीनचं चलन 'आरएमबी' (Ren-min-bi) अर्थात 'चायनीज युआन'चा वापर करण्यात येईल, असं जाहीर केलंय.
'द न्यूज इंटरनॅशनल'नं दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान-चीन द्विपक्षीय व्यापार, कर्ज आणि परतफेडी संदर्भात अमेरिकन डॉलर यापुढे वापरण्यात येणार नसल्यावर शिक्कामोर्तब केलंय. २०१७ ते २०३० अशा दीर्घकालिन योजनेंतर्गत दोन्ही देश चीनचं चलन वापरणार आहेत.
पाकिस्ताननं ग्वादरमध्ये 'आरएमबी' चलन वापरण्याची चीनची मागणी फेटाळून लावलीय. त्यामुळे, पाकिस्तानचा रुपया ग्वादर आणि इतर क्षेत्रात वापरात येणार असल्याचंही इक्बाल यांनी म्हटलंय.