नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व राखण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. मात्र, आता या दरम्यान नेपाळने भारताला एक जोरदार झटका दिला आहे.
नेपाळमधील नागिरकांनी शनिवारपासून हिमालय पर्वतावर चीनच्या ऑप्टिकल फायबर लिंकचा वापर करुन इंटरनेट वापरण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सायबर जगताशी जोडण्यासाठी नेपाळला आता भारतावर अवलंबुन रहावं लागणार नाहीये.
मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या ऑप्टिकल फायबर केबल्सच्या माध्यमातून नेपाळला इंटरनेट सेवा पुरवली जात आहे. मात्र, या इंटरनेटचा स्पीड १.५ गीगाबाईट प्रति सेकंद (जीबीपीएस) आहे. तर, भारताकडून मिळणाऱ्या इंटरनेटचा स्पीड यापेक्षा अधिक होता. भारताकडून पुरवल्या जाणाऱ्या इंटरनेटचा स्पीड हा ३४ जीबीपीएस होता.
यापूर्वी नेपाळ भारताकडून पुरवल्या जाणाऱ्या इंटरनेट सेवेवर अवलंबून होता. मात्र, चीनकडून भैरहवा, बिरगंज आणि बिरतनगर या भागात टाकलेल्या ऑप्टिकल फायबर केबल्सच्या माध्यमातून आता नेपाळला इंटरनेट सेवा पुरवण्यास सुरुवात झाली आहे.
२०१६मध्ये सरकारी कंपनी नेपाळ टेलिकॉम (एनटी)ने चीनची सरकारी कंपनी चायना टेलिकम्युनिकेशन सोबत एक करार केला. या करारानुसार चीनकडून नेपाळला इंटरनेट सेवा पुरवण्यास सुरुवात झाली आहे.
सुचना आणि प्रसारमंत्री मोहन बहादुर बासनेत यांनी नेपाळ-चीनच्या सिमेवर असलेल्या ऑप्टिकल फायबर लिंक कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. यानंतर नेपाळला चीनकडून इंटरनेट सेवा मिळण्यास सुरुवात झाली.