'त्या' एका पोस्टमुळे पॉर्न स्टार मिया खलिफाची नोकरी गेली; मालक म्हणाला, 'तू बलात्कार...'

Mia Khalifa On Hamas Attack Israel: मिया खलिफाने सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाइनदरम्यान सुरु असलेल्या वादावर भाष्य करताना केलेली एक पोस्ट तिला चांगलीच महागात पडली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 11, 2023, 10:43 AM IST
'त्या' एका पोस्टमुळे पॉर्न स्टार मिया खलिफाची नोकरी गेली; मालक म्हणाला, 'तू बलात्कार...' title=
मियाने केलेल्या पोस्टवरुन वाद निर्माण झाला आहे

Mia Khalifa On Hamas Attack Israel: काही वर्षांपूर्वीपर्यंत पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या मिया खलिफाला इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाइन वादावर भाष्य करणं फारच महागात पडलं आहे. कॅनडामधील एका पॉडकास्टरने मियाने पॅलेस्टाइनच्या बाजूने केलेली पोस्ट वाचून तिला तडकाफडकी नोकरीवरुन काढून टाकलं आहे. पॉडकास्टर टोड शॅप्रीयोने मियाबरोबरचा करार रद्द केला आहे. हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर मियाने केलेल्या पोस्टवरुन ती चांगलीच ट्रोल झाली होती. आता याच पोस्टमुळे ती बेरोजगार झाली आहे.

वाद काय अन् मिया काय म्हणाली?

जगभरामध्ये सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील संघर्षाची चर्चा आहे. मागील काही दिवसांपासून हमास या दहशतवादी संघटनेकडून इस्रायलवर हल्ले केले जात आहेत. इस्रायलही याचा जशास तसं उत्तर देत असून काही दिवसांमध्ये 1 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये इस्रायलच्या 600 नागरिकांचा आणि 400 हमास दहशतवाद्यांचा समावेश आहे. गाझामधील आरोग्याविषय यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅलेस्टाइनमधील किमान 198 जणांचा सध्याच्या संघर्षामध्ये मृत्यू झाला आहे. हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर पॅलेस्टाइन हमासला समर्थन करत असल्याचं सांगत इस्रायलने पॅलेस्टाइनवर हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. याच संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मिया खलिफाने इस्रायलविरोधात भूमिका घेत पॅलेस्टाइनसाठी एक पोस्ट केली.

"तुम्ही पॅलेस्टाइनमधील परिस्थितीकडे पाहत असाल आणि पॅलेस्टाइनच्या बाजूने नसाल तर तुम्ही चुकीच्या बाजूने आहात. सरणारा काळ काही वर्षांमध्ये इतिहासाच्या स्वरुपात याचा प्रत्यय करुन देईल," असं मिया खलिफाने म्हटलं. मात्र यंदा तिने केलेल्या पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ केलेल्या पोस्टवरुन अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. मिया खलिफा ही मूळची लेबनानमधील असून ती सध्या अमेरिकेत स्थायिक आहे. तिने केलेली ही पोस्ट अनेकांनी आवडलेली नाही.

नोकरी गेली

पॉडकास्टर टोड शॅप्रीयोनेही मियाच्या या पोस्टवर कठोर शब्दांमध्ये टिका करत तिच्याबरोबरचं कंत्राट रद्द केलं आहे. "हे फारच भयानक ट्वीट आहे मिया खलिफा. तुला तातडीने आणि या क्षणापासून कामावरुन काढून टाकत आहोत. हे फारच लज्जास्पद आहे. एक चांगली व्यक्ती होण्याचा प्रयत्न कर. तू मृत्यू, बलात्कार, मारहाण आणि अपहरणाचं समर्थन करत आहेस. तुझा हा बेजबाबदारपणा शब्दात मांडणं कठीण आहे," असं टोड शॅप्रीयोने म्हटलं आहे. पुढे बोलताना, "मानवी मूल्य जपणाऱ्या लोकांनी एकत्र यावं खास करुन अशा संकटाच्यावेळी. तू एक चांगली व्यक्ती होशील यासाठी मी प्रार्थना करतो. मात्र तू यासंदर्भात फार उशीर केला आहेस," असंही पॉडकास्टर टोड शॅप्रीयो म्हणाला आहे.

मिया खलिफा ही यापूर्वीही अनेकदा इस्रायल आणि पॅलेस्टाइन संघर्षाबद्दल उघडपणे बोलली आहे. मात्र यंदा तिला तिचं विधान फारच महागात पडल्याचं चित्र दिसत आहे.