HMPV Virus: काय करावे आणि काय करु नये? प्रशासनानेच सांगितलं; 'या' 6 गोष्टी पाळाच

HMPV Dos & Don'ts: मागील काही दिवसांमध्ये अगदी दिल्लीपासून कर्नाटकपर्यंत एएमपीव्ही विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आल्याने काय काळजी घेतली पाहिजे जाणून घ्या.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 8, 2025, 07:23 AM IST
HMPV Virus: काय करावे आणि काय करु नये? प्रशासनानेच सांगितलं; 'या' 6 गोष्टी पाळाच title=
महापालिकेने केलं आवाहन (प्रातिनिधिक फोटो)

HMPV Dos & Don'ts: चीनमध्ये एचएमपीव्हीच्या (Human Metapneumo virus) संसर्गाचा उद्रेक झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. भारतातही वेगवेगळ्या राज्यांमध्ये या विषाणूचा संसर्ग झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. नागपूरमध्येही या विषाणूचा संसर्ग झालेले संक्षयित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, त्यामुळे नागरिकांनी एचएमपीव्हीच्या संसर्गाच्या बातम्यांनी घाबरून जाऊ नये. हा एक सामान्य श्वसन विषाणू असून तो श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास (सर्दीसारख्या) कारणीभूत ठरतो, असं ठाणे महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन करताना म्हटलं आहे. एचएमपीव्ही हा एक हंगामी रोग असून तो सामान्यतः फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो असंही सांगण्यात आलं आहे. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला सर्तक राहण्याचे निर्देश दिले आहेत. 

या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ नाही

एचएमपीव्ही विषाणूसंदर्भात राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. त्यानुसार, 2023 च्या तुलनेत डिसेंबर-2024 मध्ये या आराजाच्या रुग्णात कोणतीही वाढ झालेली नाही. तरीही, खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांना श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करु नये या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 15 खाटांचा आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. 

हे करावे

> खोकला किंवा शिंका येत असतील तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका
> साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने हात वारंवार धुवा
> ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा
> भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्न खा
> संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायूविजन (व्हेंटीलेशन) राहील, याची दक्षता घ्या
> काहीही शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

हे करु नये

> हस्तांदोलन करणे
> टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर
> आजारी लोकांशी जवळचा संपर्क
> डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे
> सार्वजनिक ठिकाणी थुंकणे
> डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे

नागरिकांनी या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतना नितील यांनी दिली आहे.