नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर भारताने जोरदार टीका केली आहे. इम्रान खान पंतप्रधान पदासाठी सक्षम नाहीत आणि त्यांना आंतरराष्ट्रीय संबंधाबाबत माहिती नाही, असा हल्लाबोल भारतानं केलाय. पाकिस्तानच्या नागरिकांना नियंत्रण रेषेजवळ रॅली काढण्याचं आवाहन इम्रान खान यांनी केलं होतं. तसंच संयुक्त राष्ट्र संघात जिहादवरुन इम्रान खान यांनी वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं. यावरुन भारतानं टीका केली आहे.
तर दुसरीकडे काश्मिरी जनतेच्या आंदोलनाला भारतातर्फे इस्लामिक दहशतवाद ठरवले जात असल्याचा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. जम्मू आणि काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्याच्या निर्णयाला साठ दिवस पूर्ण झाले आहेत. यासंदर्भात इम्रान खान यांनी एक ट्वीट केले आहे. काश्मीरी जनतेचा हा संघर्ष इस्लामिक दहशतवाद ठरवला जात असल्याचे ते म्हणाले. याबाबत भारताने आक्षेप घेतला आहे.
दरम्यान, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशीही त्या संवाद साधणार आहेत. द्विपक्षीय चर्चा होणार आहे. भारत आणि बांग्लादेश दरम्यान काही महत्वाच्या करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.