Sri Lanka Economic Crisis: श्रीलंकेत आंदोलनाने उग्र रुप धारण केलं आहे. आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाचा ताबा घेतला आहे. या सगळ्यात राष्ट्रपतींनी 13 जुलैला राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी यापूर्वीच राजीनामा दिला आहे.
राष्ट्रपती गोटाबाया यांच्या घरातून सापडले कोट्यवधी रुपये
श्रीलंकेतील सरकारविरोधी निदर्शकांनी रविवारी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या अधिकृत निवासस्थानावर हल्ला केला आणि त्यांच्या बंगल्यातील कोट्यवधी रुपये जप्त केल्याचा दावा केला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे ज्यामध्ये आंदोलक जप्त केलेल्या नोटा मोजताना दिसत आहेत. जप्त केलेले पैसे सुरक्षा यंत्रणांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
श्रीलंकेत सुरू असलेल्या निदर्शनांबाबत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी निवेदन जारी केलं आहे. श्रीलंकेला आमचा नेहमीच पाठिंबा आहे. आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत निर्वासितांशी संबंधित कोणतीही समस्या नाही, असं एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.
गंभीर संकटाच्या काळात काँग्रेस श्रीलंकेसोबत - सोनिया गांधी
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही श्रीलंकेतील संकटाबाबत विधान केलं आहे. या गंभीर संकटाच्या काळात काँग्रेस श्रीलंका आणि तिथल्या जनतेशी पाठिशी आहे आणि ते या संकटावर मात करू शकतील अशी आशा आहे, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.
हिंसाचारानंतर राष्ट्रपती गायब
आंदोलकांच्या भीतीने राष्ट्रपती गोटाबाया काल रात्री लष्कराच्या मुख्यालयात लपून बसले, पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज सकाळी त्यांनी तेथून आपले लपण्याचं ठिकाणही बदलले आहे. सध्या ते कुठे लपले आहेत, याची माहिती नाही. मात्र, आंदोलक सर्वत्र राष्ट्रपतींचा शोध घेत आहेत.
श्रीलंकेच्या लष्करप्रमुखांनी जनतेला केलं आवाहन
सध्याचं राजकीय संकट शांततेने सोडवले पाहिजे, असं श्रीलंकेचे लष्करप्रमुख जनरल शवेंद्र सिल्वा यांनी रविवारी सांगितलं. जनतेने एकत्र येऊन प्रश्न सोडवावा, असं आवाहन त्यांनी केलं.
पंतप्रधानांचं घर पेटवलं
श्रीलंकेत पंतप्रधान रानिल विक्रमसिंगे यांचं घर संतप्त जमावानं पेटवलं. कोलंबोमधील हिंसक निदर्शनांनंतर अराजकाची स्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधानांनी राजीनामा दिला असतानाही त्यांच्या घराबाहेर निदर्शनं सुरू होती. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करत जमावानं त्यांचं खासगी घर पेटवून दिलं. घराबाहेर असलेल्या पत्रकारांनाही पोलिसांनी मारहाण केल्यानं जमाव अधिक चिडला.