‘चुकून जास्त पगार गेला, परत करा’ काढलेल्या कर्मचाऱ्यांचा अजुनही पिच्छा सोडेना एलन मस्क!

Elon Musk: आता इलॉन मस्क दिलेली भरपाई काढून दाखवत आहेत. काय घडलाय प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.

Pravin Dabholkar | Updated: Jun 14, 2024, 08:37 PM IST
‘चुकून जास्त पगार गेला, परत करा’ काढलेल्या कर्मचाऱ्यांचा अजुनही पिच्छा सोडेना एलन मस्क! title=
Elon Musk legal threats

Elon Musk: पुर्वीचे ट्विटर म्हणजेच आताच्या एक्सचे सर्व्हेसर्व्हा एलन मस्क हे आपल्या वादग्रस्त कृत्य आणि तडकाफडखी निर्णयांसाठी ओळखले जातात. त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त कृत्य केलंय. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क हे टेस्ला, स्पेसएक्स आणि एक्स कॉर्प सारख्या कंपन्यांचे मालक आहेत. इलॉन मस्क यांनी 2022 मध्ये सुमारे $44 बिलियनमध्ये ट्विटर विकत घेतले होते. यानंतर त्यांनी त्याचे नाव बदलून एक्स केले.  ट्विटरच्या व्यवस्थापनासह अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. जगभरात ही बातमी पसरली होती. एक्स कंपनीने कर्मचाऱ्यांची कपात करताना सर्वांना नुकसान भरपाईही देण्यात आली होती. आता एवढ्यावरच थांबतील ते एलन मस्क कसले? त्यांनी कामावरुन काढलेल्या कर्मचाऱ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली आहे. आता इलॉन मस्क दिलेली भरपाई काढून दाखवत आहेत. काय घडलाय प्रकार? सविस्तर जाणून घेऊया

कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली

कामावरुन काढलेल्या लोकांना चुकून जास्त पैसे देण्यात आले आहेत. कपात केलेल्या कर्मचाऱ्यांनी हे जास्तीचे पैसे परत करावेत असे आवाहन एलन मस्क यांनी केले आहे. एक्स कॉर्पने चलन बदलताना ही चूक झाल्याचे एलन मस्क सांगतात. चलन बदलण्यात झालेल्या चुकीमुळे कामावरून कमी करण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियन कर्मचाऱ्यांकडे जास्त पैसे गेले, असे कंपनीचे म्हणणे आहे. सिडनी मॉर्निंग हेराल्डने यासंदर्भात वृत्त दिले आहे. 

एक्स कंपनीने कामावरुन काढण्यात आलेल्या 6 कर्मचाऱ्यांकडून पैसे परत मागितले आहेत. पैसे परत न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. अलीकडे, इलॉन मस्कने टेस्लामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली होती.

डॉलर रूपांतरित करताना त्रुटी

समोर आलेल्या माहितीनुसार, एक्स कॉर्पच्या एशिया पॅसिफिक एचआर विभागाने हा ईमेल पाठवला आहे. यूएस डॉलरचे ऑस्ट्रेलियन डॉलरमध्ये रूपांतर करताना आमच्याकडू चूक झाली, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना 1500 ते 70 हजार डॉलर्सचे जास्त गेले. ही चूक जानेवारी 2023 मध्ये घडली होती. असे असले तरी आतापर्यंत एकाही कर्मचाऱ्याने पैसे परत केलेले नाहीत. 

कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले हे पेमेंट त्यांना शेअर्सच्या बदल्यात देण्यात आले. एक्स कॉर्पने चुकून या कर्मचाऱ्यांना अडीच पट पगार दिल्याचे बोलले जात आहे.

अमेरिकेत 2000 कर्मचाऱ्यांकडून खटला दाखल

एक्सने अमेरिकेतही मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली होती. यातील साधारण 2000 कर्मचाऱ्यांनी एक्स कॉर्पविरोधात विविध न्यायालयात खटले दाखल केले आहेत. आम्हाला नुकसानभरपाईची रक्कम अद्याप मिळालेली नसल्याचा दावा एक्सच्या माजी कर्मचाऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांमध्ये कंपनीचे माजी सीईओ पराग अग्रवाल आणि सीएफओ नेड सेगल यांचाही समावेश आहे.