सावधान! मुलांना तुमचा Smartphone वापरायला देताय? मग तुम्ही खूप मोठी चूक करताय

लहान मुलं Google play store वरुन आपल्याला खेळण्यासाठी फ्री गेम डाऊनलोड करतात. पण...

Updated: May 1, 2022, 07:14 PM IST
सावधान! मुलांना तुमचा Smartphone वापरायला देताय? मग तुम्ही खूप मोठी चूक करताय title=

मुंबई : आजच्या काळात जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांकडेच स्वतःचा स्मार्टफोन आहे. आता कोरोना काळामुळे अभ्यास आणि शाळा ऑनलाईन सुरु असल्याने लहान मुलांच्या हातात मोठ्याप्रमाणावर मोबाईल आला आहे. आता सगळं सुरळीत सुरु झालं असलं तरी देखील, आता लहान मुलांना ही सवय सुटण्याचं नाव घेत नाहीय.

त्यात काही लहान मुलं आपल्या स्वत:चा स्मार्टफोन असला तरी काही कारणास्तव आपल्या पालकांचा मोबाईल देखील वापरतात आणि त्यामध्ये त्यांना आवड असलेले ऍप ते डाऊनलोड करुन ठेवतात. तुमची मुलं देखील असंच काहीसं करत असतील, तर सावध व्हा. कारण हे धोकादायक आहे.

जर तुम्हीही तुमचा स्मार्टफोन मुलांना खेळायला दिला, तर आम्ही तुम्हाला सांगतो की यामुळे तुम्हाला हजारो रुपयांचे नुकसान होऊ शकते. जर तुम्हाला प्रश्न पडत असेल की, आम्ही कशाबद्दल बोलत आहोत, तर आम्ही तुम्हाला सांगतो की आजकाल गुगल प्ले स्टोअरवर असे अनेक फ्री अॅप्स आणि गेम्स आहेत जे प्रत्यक्षात सायबर चोरीसाठी काम करतात.

अशाच प्रकारचे एक मोफत गेमचे ऍप डाऊनलोड करून एका महिलेला हजारो रुपयांचे नुकसान सहन करावे लागल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे.

ही घटना यूकेमधील एसेक्स येथील आहे. दोन मुलांची आई, सारा ब्रूस हिला अचानक कळले की, काही दिवसांपूर्वी तिच्या मुलाने तिच्या फोनवर एक विनामूल्य ऍप डाउनलोड केले आहे, ज्याने तिच्याकडून 109.99 पौंड (म्हणजे सुमारे 10,000 रुपये) घेतले आहेत.

सन ऑनलाइनला घटनेचे वर्णन करताना, सारा म्हणाली की, तिचा मुलगा तिच्या फोनवर YouTube व्हिडीओ पाहत होता जेव्हा फोनच्या स्क्रीनवर 'Epic Slime - Fancy ASMR Slime Game Sim' हे नाव दिसले. ही फ्री गेमची जाहिरात पाहाताच, माझ्या मुलाने ते डाऊनलोड केले.

जेव्हा सारा ब्रूसच्या मुलाने गुगल प्ले स्टोअरवरून हे मोफत ऍप डाउनलोड केले, तेव्हा तिला 109.99 पौंड (सुमारे 10 हजार रुपये) कट झाल्याचा मेल आला. 
इतकेच नाही तर काही काळानंतर या ऍपच्या साप्ताहिक सबस्क्रिप्शनच्या नावावर तिच्या खात्यातून पुन्हा 68 हजार 99 पौंड (सुमारे 6,600 रुपये) कापले गेले. यानंतर साराने गुगलशी संपर्क साधला, तेव्हा तिला उत्तर मिळाले की या अॅपमध्ये पैसे परत करण्याचे धोरण नाही.

त्यानंतर साराने असे अनेक प्रयत्न केले, ज्यानंतर तिला तिचे काही पैसे परत मिळाले, परंतु या अपघातातून असे समजू शकते की, गुगल प्ले स्टोअर सारख्या अधिकृत प्लॅटफॉर्मवरून देखील सायबर चोरीची प्रकरणे चालविली जात आहेत. अशा परिस्थितीत कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.