भारतीय वंशाच्या दोघांनी अमेरिकेतल्या लोकांना लावला 8 हजार कोटींचा चुना; शिक्षा ऐकून सरकेल पायाखालची जमीन

Fraud : शिकागोतल्या दोन भारतीय वंशाच्या तरुणांनी सुरु केलेल्या स्टार्ट अपने अमेरिकेतील अनेकांना कोट्यावधींचा गंडा घातला आहे. 10 दिवसांच्या सुनावणीनंतर यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने अनेक गुन्ह्यांमध्ये तिघांना दोषी ठरवले आहे.

Updated: Apr 13, 2023, 02:23 PM IST
भारतीय वंशाच्या दोघांनी अमेरिकेतल्या लोकांना लावला 8 हजार कोटींचा चुना; शिक्षा ऐकून सरकेल पायाखालची जमीन title=
फोटो सौजन्य - (Twitter/ Rishi Shah)

Crime News : भारतीय वंशाच्या दोघांना आणि त्यांच्या अमेरिकेतील साथीदाराला अमेरिकेत 100 कोटी डॉलरच्या (सुमारे 8,200 कोटी रुपये) फसवणुकीप्रकरणी (fraud) दोषी ठरवण्यात आले आहे. तिघांनी अमेरिकेच्या शिकागोमध्ये (Chicago) एका हेल्थ स्टार्टअपद्वारे (Start UP) अनेकांना गंडा घालत कोट्यावधींचा घोटाळा केला आहे. यामध्ये  ग्राहक, सावकार आणि गुंतवणूकदार यांचा समावेश असून तिघांनी मिळून या सर्वांकडून कोट्यवधी रुपये लुटले आहेत. ऋषी शाह (CEO Rishi Shah) आणि श्रद्धा अग्रवाल (Shradha Agarwal) अशी या भारतीय वंशाच्या दोघांची नावे असल्याचे समोर आले आहे. ऋषी आणि श्रद्धा यांनी आरोग्य तंत्रज्ञान क्षेत्रातील 'आउटकम हेल्थ'  (Outcome Health) या स्टार्ट-अप कंपनीचे सह-संस्थापक आहेत. ऋषी शाह हे कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक होते. तर श्रद्धा अग्रवाल या कंपनीच्या माजी अध्यक्षा आहेत.

ऋषी आणि श्रद्धासह कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य वित्तीय अधिकारी ब्रॅड पर्डी यांनाही दोषी ठरवण्यात आले आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने जारी केलेल्या निवेदनानुसार, ऋषी, श्रद्धा आणि ब्रॅड यांना सुमारे 1 अब्ज डॉलर्स (सुमारे 82 अब्ज रुपये) च्या घोटाळ्याच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसच्या म्हणण्यानुसार, जवळपास 10 आठवडे चाललेल्या खटल्यानंतर, न्यायाधिशांनी ऋषी शाह (37),  श्रद्धा अग्रवाल (37) आणि ब्रॅड पर्डी (33) यांना दोषी ठरवले आहे.

ऋषी शाह यांच्यावर सुमारे 22 आरोप होते त्यापैकी 19 गुन्ह्यांमध्ये ते दोषी आढळले आहेत. यामध्ये ईमेल फ्रॉडचे 5, वायर फ्रॉडचे 10, बँक फ्रॉडचे 2 आणि मनी लाँडरिंगचे 2 गुन्हे आहेत. तर श्रद्धा अग्रवाल 17 पैकी 15 प्रकरणांमध्ये दोषी आढळली आहे. यामध्ये ईमेल फ्रॉडचे 5, वायर फ्रॉडचे 8 आणि बँक फ्रॉडची दोन प्रकरणे आहेत. पॅर्डी हे 15 पैकी 13 आरोपांमध्ये दोषी आढळले आहेत. त्यांच्यावरही मेल फ्रॉड, वायर फ्रॉड आणि बँक फ्रॉडचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

या तिघांच्या आउटकम हेल्थने अमेरिकेतील डॉक्टरांच्या कार्यालयात टेलिव्हिजन स्क्रीन आणि टॅब्लेट बसवले होते. नंतर त्या उपकरणांवर जाहिरातींची जागा ग्राहकांना विकली होती. त्यापैकी बहुतेक या फार्मा कंपन्या होत्या. डॉक्टरांच्या स्क्रीन्सवर नामांकित औषध कंपन्यांच्या जाहिराती झळकत असत. 'आउटकम हेल्थ' या औषध कंपन्यां त्यांच्या जाहिराती चालवण्यासाठी बिले पाठवत होती. आउटकम हेल्थने आपल्या औषध कंपन्यांना सांगितले की, करारानुसार डॉक्टरांच्या स्क्रीनवर जाहिराती दाखवल्या जात आहेत. कंपनीने मोठा घोटाळा केला होता. या करारनुसार येणाऱ्या बिलमध्ये कंपनीने फेरफार केली होती.

ऋषी शाह आणि श्रद्धा अग्रवाल यांनी 2006 मध्ये 'आउटकम हेल्थ' ही स्टार्ट-अप कंपनी सुरू केली होती. 2017 पर्यंत 'आउटकम हेल्थ'ने बाजारात मोठी जागा मिळवली. त्यावेळी संचालक ऋषी शाह हे  एक यशस्वी माध्यम आणि तंत्रज्ञान उद्योजक मानले जात होते. तर सह-संस्थापक श्रद्धा अग्रवाल या कॉन्फरन्स स्पीकर आणि स्टार्ट-अप सल्लागार आहेत. 

दोषींना किती शिक्षा मिळणार?

अमेरिकेमध्ये, बँक फसवणुकीसारख्या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त 30 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा आहे, तर वायर फ्रॉड आणि ईमेल फ्रॉडसाठी जास्तीत जास्त 20 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आहे. खोटी माहिती दिल्याबद्दल 30 वर्षांचा तुरुंगवास आणि मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा आहे. त्यामुळे आता जर हिशोब केला तर ऋषी शाह यांना 380 वर्षांची, तर श्रद्धाला 320 वर्षांची आणि पॅर्डीला 290 वर्षांची शिक्षा होऊ शकते.